तुम्ही सरकारी बँक, बँक ऑफ इंडियाचे (Bank of India) डेबिट कार्ड (Debit Card) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण ३१ ऑक्टोबरनंतर बँक ऑफ इंडियाच्या डेबिट कार्डचा वापर करता येणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या कार्डवरून कोणताही व्यवहार करू शकणार नाही किंवा एटीएममधून पैसे काढू शकणार नाही. तुमची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकारी बँकेनं आपल्या ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण?
यासंदर्भात बँक ऑफ इंडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. "बँक ऑफ इंडियाच्य ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना. रेग्युलेटरी गाईडलाईन्सनुसार डेबिट कार्ड सेवांचा लाभ घेण्यासाठी व्हॅलिड मोबाईलनंबर अनिवार्य आहे. डेबिट कार्ड सेवा बंद होऊ न देण्यासाठी ३१ ऑक्टोबरपूर्वी आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन मोबाइल नंबर अपडेट किंवा रजिस्टर करा," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.
जर तुम्ही बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि तुम्ही त्यांचं डेबिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला तुमच्या ब्रान्चमध्ये जाऊन मोबाइल नंबर रजिस्टर किंवा अपडेट करावा लागेल. अन्यथा तुम्हाला डेबिट कार्डाचा वापर करता येणार नाही.
ब्रान्चमध्ये जाऊन करा अपडेट
जर तुम्ही ऑनलाइन किंवा एटीएमद्वारे बँकेतील रजिस्टर मोबाइल नंबर बदलू शकत नसाल, तर ब्रान्चमध्ये जाऊन हे काम करू शकता. यासाठी ब्रान्चमध्ये जाऊन एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरा आणि पासबुक तसंच आधार कार्डाची कॉपीही सबमिट करा. यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर बदलला जाईल.