RBI on Home Loan: रिझर्व्ह बँकेनं गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकांना आता मोठा दिलासा दिला आहे. आता गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर, तुम्हाला तुमचे रजिस्ट्री पेपर ३० दिवसांच्या आत परत मिळणार आहेत. आरबीआयने बँकांना सूचना दिल्या आहेत. जर बँकेनं ३० दिवसांच्या आत रजिस्ट्री पेपर ग्राहकांना परत केले नाहीत तर बँकेला दररोज ५००० रुपयांचा दंड भरावा लागेल.
रिझर्व्ह बँकेनं मालमत्तेची कागदपत्रं परत करण्याचे नियम जारी केले आहेत. अनेकदा कर्ज फेडल्यानंतरही ग्राहकांना आपल्या मालमत्तेच्या कागदपत्रांसाठी अनेकदा बँकेच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. परंतु आता हे थांबणार आहे.
ब्रांचमध्ये असावीत कागदपत्रे
या निर्णयानंतर गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या ग्राहकांनी गृहकर्जाची परतफेड केली आहे, त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे ३० दिवसांच्या आत त्या शाखेत असणं आवश्यक आहे. यामुळे ग्राहकांना त्यांची कागदपत्रे वेळेवर परत मिळतील.
बँक देणार नुकसान भरपाई
गृहकर्ज घेतलेल्या ग्राहकाच्या मालमत्तेची कागदपत्रे हरवली किंवा कागदपत्रे खराब झाल्यास त्याची जबाबदारी बँकांना घ्यावी लागेल. बँकांना सूचना देताना आरबीआयनं स्पष्ट केलं की अशा परिस्थितीत बँकांना ग्राहकांचं नुकसान भरून काढावं लागेल. आरबीआयने बँकांना सूचना दिल्या आहेत की कागदपत्रे हरवल्यास बँकांना पुढील ३० दिवसांत नवीन कागदपत्रे तयार करावी लागतील आणि ग्राहकांना परत करावी लागतील.
दररोज ५ हजारांचा दंड
कागदपत्रे परत करताना बँकांनी उशिर करू नये असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. जर कोणत्याही बँकेनं ग्राहकांना कागदपत्रे परत करताना उशिर केला तर त्यांना दिवसाला ५ हजार रुपयांप्रमाणे दंड भरावा लागेल. गृहकर्ज फेडल्यानंतर सहजरित्या बँकांकडून पेपर्स मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. म्हणून आता रिझर्व्ह बँकेनं बँका आणि वित्तीय संस्थांना हे आदेश दिलेत.