Join us  

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:37 AM

HDFC SMS Alert : जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठं अपडेट आलं आहे. बँक ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी आता टेक्स्ट मेसेज मिळणार नाहीत. पाहा काय म्हटलंय बँकेनं.

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक (HDFC Bank) तुम्हाला माहित असेलच. जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठं अपडेट आलं आहे. बँक ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या यूपीआय व्यवहारांसाठी आता टेक्स्ट मेसेज मिळणार नाहीत. बँकेनं हा निर्णय घेतला असला तरी त्याची तात्काळ अंमलबजावणी होणार नाही. पुढील महिन्याच्या २५ तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

२५ जून २०२४ पासून आपल्या एसएमएस अलर्ट सेवेत काही बदल केले जात आहेत. आता यूपीआयच्या माध्यमातून जर तुम्ही एखाद्याला १०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवली तर फक्त एसएमएस अलर्ट पाठवला जाईल. त्याचप्रमाणे ५०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाल्यास एसएमएस अलर्ट पाठवण्यात येणार असल्याचं एचडीएफसीनं आपल्या ग्राहकांना पाठवलेल्या माहितीत म्हटलंय. 

ईमेल अलर्टमध्ये काय? 

ईमेल अलर्टमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे. ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच सर्व व्यवहारांवर ईमेल अलर्ट मिळत राहतील. बँकेनं सर्व ग्राहकांना आपला ईमेल अपडेट करण्यास सांगितलं आहे. बँकेनं सर्व ग्राहकांना ईमेल अपडेट करण्यासाठी एक लिंकही पाठवलीये. 

सरासरी रक्कम कमी होतेय 

गेल्या काही वर्षांतील यूपीआय व्यवहारांची सरासरी पाहिली तर ती कमी होत आहे. वर्ष २०२२ च्या उत्तरार्धात ही रक्कम १६४८ रुपये होती, जी वर्ष २०२३ च्या उत्तरार्धात १५१५ रुपयांवर आली. ही सुमारे आठ टक्क्यांची घट आहे. पण अल्प रकमेसाठी यूपीआयचा वापर वाढला आहे, हेही उल्लेखनीय आहे. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांची संख्या ११.८ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

टॅग्स :एचडीएफसी