Join us  

'या' सरकारी बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी; विक्रीपूर्वी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 8:45 AM

FD Rates Hike: अलीकडेच, दीपमचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी आयडीबीआय बँकेबाबत (IDBI Bank) एक निवेदन दिले होते.

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याचे काम सुरू आहे. अलीकडेच, दीपमचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी आयडीबीआय बँकेबाबत (IDBI Bank) एक निवेदन दिले होते. यामध्ये आयडीबीआय बँकेच्या खाजगीकरणासाठी लवकरच गुंतवणूकदारांकडून बोली मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. याशिवाय, आणखी दोन बँकांचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन सरकारी अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकते.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) आणि इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) यांचे खाजगीकरण होणे अपेक्षित आहे. मात्र खासगीकरणापूर्वीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवरील (फिक्स्ड डिपॉझिट) व्याजदरात वाढ करून ग्राहकांना एक भेट दिली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने व्याजदरात वाढ केली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवण्यात आला आहे. व्याजदरात बदल झाल्यानंतर 60 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. बँकेने 3 ते 5 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. त्यानंतर व्याजदर आता 5.50 टक्के झाला आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

बँकेकडून जारी करण्यात आलेले नवीन व्याजदर!व्याजदरात बदल झाल्यानंतर 7 ते 14 दिवसांच्या मुदत ठेवींवर 2.75 टक्के व्याज मिळेल. तसेच, 15 ते 30 दिवसांच्या मुदत ठेवींवर 2.90 टक्के व्याज आहे. त्याचप्रमाणे 31 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3 टक्के, 46 ते 59 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.35 टक्के, 60 ते 90 दिवसांच्या मुदत ठेवींवर 3.50 टक्के आणि 91 ते 179 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4 टक्के व्याज मिळू शकते. याचबरोबर, 180 ते 270 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.65 टक्के, 271 ते 364 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.75 टक्के, 1 वर्ष ते 2 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.45 टक्के, 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.50 टक्के आणि 3 वर्षे ते 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.50 टक्के व्याजदर आहे. तसेच, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 5 ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.60 टक्के व्याज मिळेल.

टॅग्स :बँकव्यवसाय