Join us

Cibil Score : तर काय कराल?  क्रेडिट स्कोअर घसरला, आता..?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 10:38 AM

सिबिल स्कोअरचे महत्त्व नीट समजून घेणे आणि तो कमकुवत असल्यास ते मजबूत करण्यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे.

कोरोनाकाळात कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे सिबिल स्कोअर कमी झाला आहे. आता कुठेच कर्ज उपलब्ध होत नाही. कोरोनासंदर्भात सरकारने सवलती दिलेल्या होत्या. पण बँका कर्ज नाकारतात. यासाठी काही उपाय आहे का? - एक वाचकसिबिल स्कोअरचे महत्त्व नीट समजून घेणे आणि तो कमकुवत असल्यास ते मजबूत करण्यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे. बँका नेहमी व्यक्तीचा सिबिल स्कोअर तपासल्यानंतरच कर्ज मंजूर करतात. सिबिल स्कोअरला क्रेडिट स्कोअर असेही म्हणतात. याच्या मदतीने बँका तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करता की नाही हे तपासून पाहतात. तुमचा क्रेडिट इतिहास चांगला असेल तेव्हाच/तरच तुमचा सिबिल स्कोर सुधारेल. म्हणूनच आधी घेतलेले कर्जाचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डचे बिल तुम्ही योग्य वेळी भरत राहणे महत्त्वाचे आहे. कर्जाचे मासिक हप्ते चुकले, तर सिबिल स्कोअर कमी होतो.कोरोना काळात रिझर्व्ह बँकेने सर्व प्रकारच्या कर्जाच्या मासिक हप्त्यांच्या परतफेडीवर स्थगिती जाहीर केली होती. लॉकडाऊनमुळे कर्जाचा हप्ता चुकला तर त्याचा  सिबिल रेटिंगवर कोणताही परिणाम होणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. तशा सूचना सर्व बँका आणि कर्ज देणाऱ्या संस्थांना देण्यात आल्या होत्या. या  उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आणि कोरोनाच्या भीषण काळासाठी होत्या. कर्जदारांना त्यांचा कायमस्वरूपी लाभ मिळावा अशी त्यामागची कल्पना नव्हती. आता परिस्थिती सुधारत असताना आपले सिबिल रेटिंग कमी असेल तर  नव्याने कर्ज मिळण्यात अडचणी येतील. हे रेटिंग सुधारण्याचा शॉर्टकट उपलब्ध नाही.

मासिक हप्त्याची किंवा क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरणे, कर्जाची वेळेवर परतफेड करणे आवश्यक आहे.   एकरकमी परतफेड जमणार नसेल तर लहानलहान रकमांचे हप्ते भरत राहणे श्रेयस्कर होईल. तुमच्या संयुक्त खात्यांचे वेळोवेळी पुनरावलोकन करा. संयुक्त कर्जाच्या बाबतीत, मासिक हप्ता भरण्याची समान जबाबदारी दोन्ही खातेदारांवर असते आणि याचा थेट परिणाम दोघांच्याही क्रेडिट स्कोअरवर होतो. कोरोना काळात मिळालेल्या सवलती दीर्घकाळ मिळणे शक्य नाही, हे वास्तव आहे.

दिलीप फडके,ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते  तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com

टॅग्स :बँकव्यवसाय