credit card scam : डिजिटल पेमेंटप्रमाणे क्रेडिट कार्डचा वापर आता सामान्य झाला आहे. तुम्हाला बहुतांश नोकरदार लोकांकडे क्रेडिट कार्ड मिळतील. बँकाच नाही तर अगदी फायनान्स कंपन्यांनीही या क्षेत्रात उडी घेतली आहे. तुम्हाला एका कॉलवर सहज ते मिळून जाते. मात्र, यासंबंधीचे अनेक घोटाळेही दररोज घडत आहेत. मार्केटमध्ये सध्या नवीन क्रेडिट कार्ड स्कॅम आला आहे. आजकाल तरुणांसोबत तो सर्रास घडताना पाहायला मिळतो. विशेषत: असे नोकरदार ज्यांचे पगार कमी आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फसवणुकीमुळे तुमचे कोणतेही नुकसान होत नाही. पण, तुमचा CIBIL स्कोर खराब होतो.
क्रेडिट कार्ड घोटाळा कसा चालतो?
भारतातील डेटा गोपनीयता कायद्याच्या त्रुटीचा फायदा घेऊन, अनेक एजन्सी तुमची वैयक्तिक माहिती जसे की नाव, फोन नंबर आणि पॅन नंबर गोळा करतात. यानंतर या एजन्सी तुम्हाला कॉल करतात आणि मोठी मर्यादा असलेले नवीन क्रेडिट कार्ड ऑफर करतात. कॉलर तुम्हाला ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक क्रेडिट लिमिट मिळेल, असे आमिष दाखवतात.
मोठी रक्कम पाहून अनेकजण फसतात. प्रत्यक्षात तुम्ही कार्डसाठी अर्ज केल्यानंतर आणि सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खूप कमी मर्यादा असलेले कार्ड हातात ठेवले जाते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला ५०,००० रुपये मर्यादा असलेले क्रेडिट कार्ड देऊ असं सांगितलं होतं. त्याला प्रत्यक्षात फक्त २५ हजार मर्यादा असलेले कार्ड दिले जाते. तुमच्या बाबतीत असे काही घडल्यास, त्याचा परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होऊ शकतो.
तुमचा CIBIL स्कोअर कसा खराब होतो?
वास्तविक, क्रेडिट कार्डचा वापर एका प्रकारच्या छोट्या कर्जाप्रमाणे केला जातो. तुम्ही तुमच्या क्रेडिट मर्यादेचा मोठा भाग खर्च केल्यास, त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, जर तुमची कार्ड मर्यादा २५,००० रुपये असेल आणि तुम्ही २०,००० रुपये खर्च करत असाल, तर तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो ७५% होईल, जे आदर्शपणे ३०% पेक्षा कमी असावे. हाय यूटिलाइजेशन रेशिओ तुमचा CIBIL स्कोअर कमी करू शकतो.
या एजन्सींचे उद्दिष्ट फक्त कार्ड विकणे आहे, कारण त्यांना विकलेल्या प्रत्येक क्रेडिट कार्डवर कमिशन मिळते. त्यामुळे, ते ग्राहकांना मोठी क्रेडिट मर्यादांचे आश्वासन देऊन कार्ड विकतात. परंतु, प्रत्यक्षात कमी मर्यादा देऊन ते ग्राहकांची आर्थिक फसवणूक करत आहेत.
कशी टाळायची फसवणूक?
अशी फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही थेट बँकेशी संपर्क साधावा. नवीन क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी नेहमी बँकेशी थेट संपर्क साधा, असे तज्ज्ञांचे मत आहे. बँकेने दिलेली माहिती अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित असते. याशिवाय कार्डच्या नियम आणि अटी वाचा. कोणतेही क्रेडिट कार्ड सक्रिय करण्यापूर्वी, त्याच्या अटी काळजीपूर्वक वाचा. कोणतीही एजन्सी कॉल करत असल्यास आणि तुम्हाला क्रेडिट कार्ड ऑफर करत असल्यास, त्याची वैधता निश्चित करा. याशिवाय कोणत्याही एजन्सीकडून तुमची फसवणूक झाली असेल, तर लगेच बँक आणि संबंधित प्राधिकरणाला कळवा.