सध्या तुमच्या क्रेडिट स्कोअरची (Credit Score) स्थिती तुमच्या वर्तमानातील व्यवहारासाठी खूप महत्त्वाची बनली आहे. ज्यावेळी तुम्हाला कर्जाची गरज असते तेव्हा बँका आणि वित्तीय संस्था प्रथम तुमचा क्रेडिट स्कोअर तपासतात. आता एखाद्या बँकेकडून लोन (Loan) घेताना, तुमचा पगार किती आहे किंवा दर महिन्याला तुम्ही व्यवसायातून किती कमाई करता, या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे हे देखील खूप महत्वाचे बनले आहे.
कर्ज घेताना (Loan Application) क्रेडिट स्कोअरवरून एखाद्याला किती कर्ज द्यावे हे बँका आणि वित्तीय संस्था ठरवत असतात. काही वेळा कर्जाचे व्याजदरही क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. क्रेडिट स्कोअरचे मोजमाप कर्ज घेणाऱ्याच्या क्रेडिट स्कोरच्या पूर्वीच्या आर्थिक व्यवहारावर अवलंबून असते. जर तुमचा क्रेडिट स्कोरचा इतिहास चांगला असला की कर्ज मिळण्यास सुलभता येते.
कर्जासाठी क्रेडिट स्कोअर किती असावा?
कर्ज घेताना ज्यांचा क्रेडीट स्कोर 750 किंवा त्याहून अधिक आहे त्यांना लवकर आणि सहज कर्ज मिळण्यास मदत होते. त्यामुळे क्रेडिट स्कोअरचा थेट संबंध तुमच्या वर्तमानातील आणि भविष्यातील आर्थिक व्यवहाराशी असतो. यावरून कळते की, क्रेडिट स्कोर किती महत्त्वाचे आहे ते.
एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर नेमका का खराब होतो? बहुतेक प्रकरणांमध्ये, क्रेडिट स्कोअर तुमच्या लहान-लहान चुकांमुळे खराब होतो. चला तर जाणून घेऊया नेमक्या कोणत्या चुकांमुळे तुमचा क्रेडिट स्कोरवर परिणाम होतो.
EMI किंवा Credit card च्या पेमेंटसाठी शेवटच्या तारखेची वाट पाहत बसू नका-
ग्राहकांनी शक्यतो कर्जाचा मासिक हप्ता किंवा क्रेडिट कार्ड बिल भरण्याची शेवटची तारीख चुकवू नये. ही बिले भरण्यास उशीर झाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होतो. त्यामुळे हे हप्ते भरण्यास शेवटच्या तारखेची वाट न पाहणे चांगले. तुमच्याकडे झटपट पैसे नसले तर शेवटच्या तारखेपूर्वी तुमची बिलं किंवा EMI निश्चितपणे भरला पाहिजे.
क्रेडिट मर्यादा आणि कर्ज-
बँकेने तुम्हाला किती क्रेडिट लिमिट दिली आहे आणि तुम्ही किती कर्ज घेतले आहे, यावरूनही क्रेडिट स्कोरवर फरक पडतो. तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो जितका कमी असेल तितका तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला. समजा, तुमची कर्ज मर्यादा 1 लाख रुपये आहे आणि तुम्ही 50 हजार रुपये कर्ज घेतले आहे, तर तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो 50 टक्के असेल.
तुमच्याकडे किती क्रेडिट कार्ड आहेत आणि तुम्ही प्रत्येक कार्डसाठी किती रक्कम वापरली आहे, या सर्व गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत. ज्यांनी एकूण मर्यादेच्या 40 टक्क्यांपेक्षा कमी कर्ज घेतले आहे अशा ग्राहकांना कंपन्या प्राधान्य देतात.
उत्पन्न आणि EMI
तुम्ही किती कमावता आणि तुमच्यावर किती कर्ज आहे हे लक्षात ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. ईएमआई-टु-इनकम कमाल मर्यादा 50 टक्के मानली जाते. जर तुमचे मासिक उत्पन्न 40 हजार असेल आणि तुमचा सध्याचा EMI हा 10 हजार असेल, तर तुमचे EMI-ते-उत्पन्न प्रमाण 25% असेल.
लोन सेटलमेंट टाळा-
कर्ज न भरल्यास, बहुतेक लोक कर्जाची सेटलमेंट करतात. पण जर तुम्ही सेटलमेंट केली तर तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमध्येही ही गोष्ट नमूद होते. याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. सेटलमेंटनंतर, जेव्हा तुम्ही नवीन कर्जासाठी जाता, तेव्हा कर्जासाठी अडचणी येतात.
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी क्रेडिट स्कोअर तपासा-
तुम्ही कर्जासाठी अर्ज करणार असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर नक्की तपासला पाहिजे. जर तुमचा स्कोअर कमी असेल तर बँक तुमच्याकडून जास्त व्याज आकारेल किंवा तुमचा अर्ज रद्द करेल. अर्ज रद्द केल्याने तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो.
जामीनदार होणे टाळा-
संयुक्त खातेदार बनणे किंवा दुसऱ्याच्या कर्जाचे हमीदार बनू नका. त्याने केलेली कोणतीही चूक तुमच्या CIBIL स्कोअरवर नकारात्मक परिणाम करते.