Bank Cheque : सर्वात सुरक्षित व्यवहार करण्याचे साधन म्हणून 'चेक'चा (धनादेश) वापर होतो. तुम्हीही कधी ना कधी चेकचा वापर नक्कीच केला असेल. परंतु, चेकच्या प्रकारांबद्दल तुम्हाला माहित आहे का? तुम्हीच काय पण अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या चेकबद्दल माहितीही नसते. असाच एक चेक म्हणजे क्रॉस चेक. यामध्ये वरच्या डाव्या कोपऱ्यात २ समांतर रेषा काढल्या आहेत. या रेषा का काढल्या आहेत माहीत आहे का?
क्रॉस चेक म्हणजे काय?
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 च्या कलम 123 नुसार, चेक जारी करणारी व्यक्ती चेकच्या डाव्या बाजूला काढलेल्या २ रेषांद्वारे बँकेला सांगते की तो क्रॉस केलेला चेक आहे. या चेकची खास गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन त्यामधून पैसे काढू शकत नाही. ज्यांच्या नावाने क्रोस चेक दिला आहे. फक्त त्यांच्याच बँक खात्यात हा वटवला जाऊ शकतो. किंवा संबंधित व्यक्ती हा चेक दुसऱ्याला देण्याची मान्यता देऊ शकतो. मात्र, यासाठी त्याला चेकच्या पाठीमागे स्वाक्षरी करावी लागते. क्रॉस चेकचे अनेक प्रकार आहेत. पहिला सामान्य क्रॉसिंग आहे, ज्यामध्ये चेकच्या काठावर २ रेषा काढल्या जातात. क्रॉस चेकबद्दल आतापर्यंत तुम्ही जे वाचलं ते सर्व फक्त सामान्य क्रॉसिंग अंतर्गत येते.
विशेष क्रॉसिंग चेक
निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 च्या कलम 124 नुसार, चेक जारी करणाऱ्याला चेक ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहे, त्या व्यक्तीच्या विशिष्ट बँक खात्यात जावे असे वाटते तेव्हा विशेष क्रॉसिंग केले जाते. समजा तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे देणार आहात. त्या व्यक्तीची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. अशा परिस्थितीत चेक जारी करणारी व्यक्ती चेकच्या तळाशी असलेल्या रिकाम्या जागेत २ समांतर रेषा काढून बँकेचे नाव लिहू शकते. अशा परिस्थितीत, धनादेशाद्वारे पैसे फक्त त्या बँकेच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात, ज्याचे नाव चेकवर लिहिलेले असेल.
चेकमध्ये क्रॉसिंग लाइन्समध्ये अकाउंट पेई (A/C Payee) लिहिले असल्यास, याचा अर्थ चेकवर ज्याचे नाव लिहिलेले असेल तीच व्यक्ती त्यातून पैसे काढू शकेल. या केसमध्ये त्याला त्याच्या कोणत्याही बँक खात्यात चेक जमा करण्याची मुभा असते. मात्र, स्पेशल क्रॉसिंग करताना कोणत्याही बँकेचे नाव लिहिले असेल, तरच पैसे त्या बँकेत जातील. या चेकचं वैशिष्ट्य म्हणजे याला कोणीही मान्यता देऊ शकत नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने हा चेक असेल त्याच व्यक्तीच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होते. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट 1881 मध्ये याबद्दल कोणताही उल्लेख नाही. परंतु, अनेक बँका ही पद्धत वापरतात. एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवरही याचा उल्लेख आहे.
क्रॉस चेक जारी करण्याचा एकच उद्देश आहे, तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्याच व्यक्तीला ते मिळावे. अशा परिस्थितीत चेक चुकीच्या हातात पडला तरी त्यातून पैसे काढता येणार नाहीत. म्हणजेच चेक क्रॉस केल्याने त्याची सुरक्षा अजून वाढते.