Cryptocurrency in India: भारतासारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेसाठी क्रिप्टोकरन्सी ही गंभीर समस्या असल्याचं रिझर्व्ह बँकेचं (RBI) मत आहे. आर्थिक स्थिरतेसाठी क्रिप्टो मार्केट चांगलं नसल्याची प्रतिक्रिया रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली. क्रिप्टोशी निगडीत अनेक धोक्यांची आम्हाला चांगली जाणीव आहे आणि ती योग्य प्रकारे हाताळली पाहिजे. हे व्यवहार करणाऱ्यांना तुम्ही कोणाला, काय आणि का देत आहात हे विचारलं पाहिजे. क्रिप्टोकरन्सीची अद्याप कोणतीही विश्वसनीय व्याख्या नाही. असं काय आहे जे क्रिप्टो करू शकतं आणि सीबीडीसी करू शकत नाही हे समजण्याची आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले.
"लोकांचं हित पूर्ण करणाऱ्या नवकल्पनांना दडपण्याच्या बाजूनं रिझर्व्ह बँक नाही. भारतीय बँकिंग सेक्टर आणि एनबीएफसी सेक्टर सध्या मजबूत स्थितीत आहे," असं दास म्हणाले. रिझर्व्ह बँक सुशासनावर भर देते आणि उत्तम आकडेवारी हेच दर्शवत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
या मुद्द्यांवर भर
सुशासनाच्या संदर्भात आरबीआय तीन मुद्यांवर भर देते. यामध्ये रिस्क मॅनेजमेंट, कम्प्लायन्स आणि इंटरनल ऑडिट यांचा समावेश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
खासगी बँकांचे कर्मचारी नोकरी सोडतायतकाही खासगी क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी सोडण्याची प्रवृत्ती अधिक दिसून येत आहे. आरबीआय या मुद्द्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. रेग्युलेटरी सुपरव्हिजन एफर्ट्सच्या रुपयात आरबीआय याकडे पाहत असल्याचं दास म्हणाले.
खाजगी क्षेत्रातील काही मोठ्या बँकांमध्ये, कर्मचारी कमी होण्याचं प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत, यावर दास यांनी वक्तव्य केलं. अशा समस्यांना तोंड देण्यासाठी प्रत्येक बँकेला एक कोर टीम तयार करावी लागेल. बदलत्या नोकऱ्यांबाबत तरुणांचा करिअरचा दृष्टीकोन बदलला आहे असं ते म्हणाले. तरुण आता या पैलूवर ‘वेगळा विचार’ करत असल्याचंही ते म्हणाले.
जीडीपी आकडेवारी अवाक् करणारी
दास यांच्या मते, अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग मजबूत आहे आणि दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीचे आकडे सर्वांनाच चकित करतील. भू-राजकीय अनिश्चितता हा जागतिक विकासासाठी सर्वात मोठा धोका आहे, परंतु कोणत्याही संभाव्य धोकादायक परिस्थितीला सामोरं जाजाण्यासाठी भारत अधिक योग्य स्थितीत असल्याचे दास म्हणाले.
"अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी क्रिप्टोकरन्सी योग्य नाही," GDP बाबतही RBI गव्हर्नरांचं मोठं वक्तव्य
लोकांचं हित पूर्ण करणाऱ्या नवकल्पनांना दडपण्याच्या बाजूनं रिझर्व्ह बँक नाही, असं वक्तव्य दास यांनी केलं.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 09:07 AM2023-11-01T09:07:10+5:302023-11-01T09:08:16+5:30