स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मुदत ठेवींवरील व्याजदरात 20 बेसिस पॉईंट्सपर्यंत वाढ केली आहे. बँकेच्या वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीवर ही वाढ करण्यात आली आहे. नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू होतील. बँकेच्या वेबसाइटनुसार FD वर वाढलेले व्याजदर 15 ऑक्टोबर 2022 पासून लागू होतील. बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. एसबीआयच्या वेबसाइटनुसार, एफडीवरील व्याजदर 10 बेसिस पॉइंट्स ते 20 बेस पॉइंट्स दरम्यान वाढतील.
SBI मध्ये 46 दिवसांपासून ते 179 दिवसांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या FD वरील व्याजदर आता 4 टक्के दराने उपलब्ध असतील. यापूर्वी या कालावधीसाठी 3.90 टक्के इतका व्याजदर होता. व्याजदरातील बदलानंतर 180 दिवस ते 210 दिवसांच्या कालावधीसह किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदर 4.55 टक्क्यांवरून 4.65 टक्के करण्यात आला आहे.
बँकेने 211 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी ठेवीवरील व्याजदर 4.60 टक्क्यांवरून आता 4.70 टक्के केला आहे. SBI रिटेल डोमेस्टिक टर्म डिपॉझिट खात्यांवरील एक वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीवरील व्याजदर आता 5.45 टक्क्यांवरून 5.60 टक्के झाला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठीही व्याजदर वाढले
दोन वर्ष ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.65 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, तीन वर्ष ते पाच वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 5.60 टक्क्यांवरून 5.80 टक्के झाला आहे. तर, पाच वर्ष ते 10 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवरील व्याजदर 5.65 टक्क्यांवरून 5.85 टक्के करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी, 7 दिवस ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवर आता 3.5 टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी या कालावधीसाठी 3.40 टक्के व्याजदर होता. तर 46 दिवस ते 179 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर 4.40 टक्क्यांवरून 4.50 टक्के करण्यात आला आहे.