Join us  

जास्त बँकांमध्ये खाती असणं तोट्याचं; समजून घ्या कसं होऊ शकतं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 12:21 AM

बँकेच्या नियमांनुसार, बँक खात्यात १२ महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही, तर बँक ते खाते निष्क्रिय घोषित करते.

हल्ली बरेचसे आर्थिक व्यवहार ऑनलाइन झालेत. त्यामुळे बँकेत जाणं वगैरे फारसं होत नाही. तरीही, बरेच जण घराजवळ किंवा ऑफिसजवळ असलेल्या बँकेतच खातं उघडणं पसंत करतात. घर किंवा नोकरी बदलली की नव्या घराच्या किंवा नव्या ऑफिसच्या जवळ असणारी बँक ते निवडतात. स्वाभाविकच, आधीच्या खात्यांकडे त्यांना लक्ष देता येत नाही आणि त्याचाा फटका बसतो. आधीच्या बँकेतील आपलं खातं तर सक्रिय राहतं आणि त्या सर्व खात्यांचे तपशील प्राप्तिकर विभागाकडे असतात.

बँक खात्याबाबत नियम काय सांगतो?

बँकेच्या नियमांनुसार, बँक खात्यात १२ महिन्यांपर्यंत कोणताही व्यवहार झाला नाही, तर बँक ते खाते निष्क्रिय घोषित करते. तसंच, जर २४ महिन्यांपर्यंत बँकेत कोणताही व्यवहार झाला नाही, तर बँक खाते डॉरमेंट खाते म्हणून घोषित करते. अशा परिस्थितीत खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल बँक शुल्क आकारते. दीर्घकाळ कोणताही व्यवहार न केल्यास आणि किमान शिल्लक न ठेवल्यास, सेवा शुल्क म्हणून बँकेला मोठी रक्कम द्यावी लागू शकते.

'ते' अकाऊंट बंद करणंच उत्तम!

नोकरी बदलल्यावर, प्रत्येकाला नवीन कंपनीने सांगितलेल्या बँकेत सॅलरी अकाउंट उघडावं लागतं. अशा परिस्थितीत, आधीच्या बँकेत जेव्हा पगार जमा होणं थांबतं तेव्हा बँक या पगार खात्याचं बचत खात्यात रूपांतर करते आणि किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल शुल्क आकारते. हे टाळण्यासाठी बँक खाते बंद करा, खाते बंद करण्यापूर्वी खात्यातून सर्व पैसे काढावे लागतील, त्यानंतर बँक खाते बंद करण्यासाठी अर्ज करून सांगावे लागेल. त्यानंतर बँक तुमचे खाते बंद करेल.