Join us  

गृहकर्ज होणार स्वस्त, पण बँक FD वर होईल तोटा; व्याजदरात किती होऊ शकते कपात?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 3:52 PM

RBI Start Rates Cut : यूएस फेडरलनंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील व्याजदर कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे गृहकर्ज व्यस्त होणार आहे.

RBI Start Rates Cut : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईने सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. तर महागाई नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून वारंवार पावलं उचलली जात आहेत. देशात गेल्या ४ वर्षांपासून बँकांचे व्याजदर वाढतच आहेत. यामध्ये लोकांना बचत योजनांचा फायदा होत असला तरी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याज द्यावे लागत आहे. वाढती महागाई रोखण्यासाठी नुकतेच अमेरिकेने व्याजदर कपातीची घोषणा केली. आता भारतातही ऑक्टोबरपासून ती सुरू होण्याची शक्यता आहे. 

एसएंडपी ग्लोबल रेटिंग्सने सांगितले की, RBI आपल्या ऑक्टोबरच्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. S&P ग्लोबल रेटिंग्सने चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी भारताचा वाढीचा अंदाज ६.८ टक्के कायम ठेवला आहे. एजन्सीने म्हटले आहे, की देशातील ठोस वाढीमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आपल्या लक्ष्यानुसार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी लक्ष केंद्रीत करू शकतो.

व्याजदरात किती कपात होईल?भारतात महागाई नियंत्रणात असूनही शेअर बाजारातही चांगली वाढ आहे. देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत दिसत आहे. अशा परिस्थितीत आरबीआय व्याजदर कपातीला सुरुवात करू शकतो. याचा परिणाम शेअर बाजारातील विशेषकरुन बँकिंग क्षेत्रांतील शेअर्समध्ये तेजी येण्याची शक्यता आहे. रेटींग एजन्सीने म्हटलं, की देशात उच्च व्याजदरांचा शहरी मागणीवर परिणाम झाला आहे. एप्रिल-जून तिमाहीत GDP वाढ कमी झाली. हे संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ६.८ टक्के असलेल्या GDP वाढीच्या अंदाजानुसार आहे. मागील आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ८.२ टक्के दराने वाढली होती. आरबीआय लवकरात लवकर ऑक्टोबरमध्ये दर कमी करण्यास सुरुवात करेल आणि चालू आर्थिक वर्षात (मार्च २०२५) दोनदा दर कमी करण्याची योजना आखत असल्याचा अंदाज एजन्सीने वर्तवला आहे.

दोन्ही बाजूंनी २ टक्क्यांच्या फरकाने चलनवाढ चार टक्क्यांवर ठेवण्याचे लक्ष्य सरकारने आरबीआयला दिले आहे. RBI चे व्याजदर ठरवणाऱ्या चलनविषयक धोरण समितीची बैठक ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय बँकेने फेब्रुवारी २०२३ पासून धोरणात्मक दर ६.५ टक्क्यांवर ठेवला आहे. यूएस मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनेही आपल्या धोरणात्मक व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. यानंतर पुढील महिन्यात आरबीआय ०.२५ टक्के कपात करण्याची अपेक्षा आहे. 

 

 

 

 

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्रपैसा