रिझर्व्ह बँकेचे पतधोरण ६ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. पॉलिसीमध्ये रेपो दरात कपातीची घोषणा केली जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, यावेळी आरबीआय रेपो दरात २५ बेसिक पॉईंट्सची (०.२५%) कपात करू शकते. आरबीआयच्या या निर्णयाचा तुम्हालाही मोठा फायदा होऊ शकतो.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) जेव्हा रेपो दरात कपात करते, तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या ईएमआयवर होतो. आरबीआयने रेपो दरात ०.२५% (२५ बेसिस पॉइंट्स) कपात केली, तर ३०लाख गृहकर्जावरील आपल्या ईएमआयमध्ये किती फरक पडेल? तसेच जर तुम्हाला तुमचा ईएमआय लवकर क्लिअर करायचा असेल तर तुम्ही कोणती पावलं उचलू शकता? सोप्या भाषेतून समजून घेऊ.
रेपो दरात कपातीचा गृहकर्जावर परिणाम
रेपो दर म्हणजे आरबीआय बँकांना ज्या व्याजदरानं कर्ज देते. जेव्हा हा दर कमी होतो तेव्हा बँकाही कर्ज स्वस्त करतात, ज्याचा परिणाम तुमच्या ईएमआयवर होतो.
उदाहरणाने समजून घेऊ
गृहकर्जाची रक्कम : ३० लाख रुपये
सध्याचा व्याजदर : ८.५० टक्के
कर्जाचा कालावधी : २० वर्षे
सध्याचा ईएमआय: २५,८४६ रुपये
जर आरबीआयनं रेपो दरात ०.२५% कपात केली आणि बँकांनी व्याजदर ८.२५% पर्यंत कमी केला तर तुमचा ईएमआय असा बदलेल:
नवा ईएमआय : २५३८६ रुपये
फरक : ४६० रुपये प्रति महिना
म्हणजेच तुमची दरमहा ४६० रुपयांची बचत होईल. बदललेल्या व्याजदराला आधार मानल्यास २० वर्षांत ही बचत १,१०,४०० रुपयांपर्यंत होऊ शकते.