Join us  

लोन रिकव्हरीसाठी बनावट एजंट्स देतायत धमकी, इकडे करा तक्रार; काय म्हणतो RBI चा नियम?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 4:10 PM

Complaint Against Recovery agents: जर तुम्हाला रिकव्हरी एजंट्स त्रास देत असतील तर तुम्हाला यासंदर्भात तक्रारही करता येऊ शकते.

तुम्ही किंवा तुमच्या ओळखींच्यांपैकी कोणी कर्ज घेतलंय का? काही कारणास्तव तुम्हाला ते भरण्यात अडचणी येत असतील आणि तुम्हाला जर रिकव्हरी एजंट्सकडून त्रास देण्यात येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा रिकव्हरी एजंट्सकडून धमकावण्यात येतं किंवा सातत्यानं त्रास दिला जातो. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

लोनची रक्कम भरण्यास काही समस्या येत असतील तर अनेकदा बनावट लोन रिकव्हरी एजंट्स ग्राहकांना धमकावतात. परंतु रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तुम्हाला कोणी धमकावू शकत नाही. यासंदर्भात तुम्ही तक्रारही करू शकता.

काय म्हणतो नियम?आरबीआयच्या नियमांनुसार, रिकव्हरी एजंट तुम्हाला फक्त सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेत कॉल करू शकतात. तसेच, ते तुम्हाला धमकावू शकत नाहीत किंवा कोणतेही अपमानास्पद मेसेजही करू शकत नाहीत. ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत तो त्यांच्याबद्दल तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला त्यांनी पाठवलेले सर्व मेसेज आणि कॉल्सचे रेकॉर्डिंग ठेवावं लागेल. जेणेकरून त्यांनी तुम्हाला त्रास दिल्याचं सिद्ध होईल.

अशी करू शकता तक्रारकर्ज वसुलीसाठी कोणी तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करू शकता. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्यास त्या बँकेविरुद्ध दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करता येते. या सर्वांशिवाय तुम्ही त्या एजंटचे कॉलिंग नंबर, कॉल रेकॉर्डिंग, एसएमएस किंवा मेसेज सेव्ह करू शकता.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकपैसाबँक