SBI Investors Warning: आर्थिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करणं खूप महत्वाचं आहे. सध्या सामान्य माणसाकडेही गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. बँक एफडीपासून म्युच्युअल फंडापर्यंत आणि पीपीएफपासून शेअर मार्केटपर्यंत सामान्य माणूस आपल्या क्षमतेनुसार आणि गरजेनुसार कुठेही गुंतवणूक करू शकतो. परंतु देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे सर्वसामान्यांचीच नव्हे तर सरकारांचीही झोप उडाली आहे. अशातच भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं आपल्या ग्राहकांना इशारा दिलाय.
स्टेट बँकेनं दिला इशारा
स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून हा इशारा दिलाय. स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या सर्व ग्राहकांना आणि सर्वसामान्य जनतेला सावध केलंय. सोशल मीडियावर काही गुंतवणूक योजना सुरू करण्याचा किंवा पाठिंबा देण्याचा दावा करत त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे डीपफेक व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. हे व्हिडीओ लोकांना तांत्रिक साधनांच्या माध्यमातून अशा योजनांमध्ये आपले पैसे गुंतविण्याचा सल्ला देत आहेत. एसबीआय किंवा त्यांचा कोणताही अधिकारी अवास्तव किंवा असामान्यपणे उच्च परताव्याचं आश्वासन देणारी कोणतीही इनव्हेस्टमेंट स्कीम ऑफर किंवा त्याला समर्थन देत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा डीपफेक व्हिडिओंना बळी पडू नये, असा इशारा एसबीआयनं दिलाय.
AI चा होतोय वापर
देशात आणि जगभरात एआयचा वापर हळूहळू वाढत आहे. तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारही सायबर फसवणुकीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. कोणत्याही प्रकारची सायबर फसवणूक रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातहेत. मात्र, लोकांनीही त्यांच्यावतीनं सावध गिरी बाळगण्याची गरज आहे. मोठ्या परताव्याच्या लोभात अडकून तुम्ही तुमच्या कष्टानं कमावलेले पैसेही गमावू शकता.