Bank Transfer Policy : तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक बँकेत काम करत असतील तर त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्की पोहचवा. कुठल्याही सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रात बदली हा नेहमी कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेक ठिकाणी पैसे किंवा सेटींग लावून इच्छित ठिकाणी बदली करुन घेतली जाते. मात्र, आता ही पद्धत बंद होणार असून बँका नवीन ट्रान्सफर पॉलिसी आणण्याच्या विचारात आहे. वास्तविक, अर्थ मंत्रालयाने मंगळवारी बँकांना बदली धोरणाबाबत अनेक सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बदली धोरणामध्ये अधिक पारदर्शकता आणणे हा या सूचनांचा उद्देश आहे.
PSB च्या प्रमुखांना जारी केलेल्या सल्ल्यानुसार, वित्तीय सेवा विभागाने बँकांना या सूचना त्यांच्या संबंधित 'ट्रान्सफर पॉलिसींमध्ये' त्यांच्या मंडळाच्या मान्यतेने समाविष्ट करण्यास सांगितले आहे. येत्या २०२५-२६ पासून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
बँकांनी सुधारित धोरणाची प्रत लवकरात लवकर या विभागाकडे पाठवण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये अधिक पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एकसमान आणि विवेकाधीन धोरण तयार करण्यासाठी ट्रान्सफर पॉलिसीमध्ये बदल करण्यास सुचवले आहे.
महिलांना होणार फायदा
या बदलांमध्ये बँकांनी ट्रान्सफर प्रक्रिया स्वयंचलित करणे आणि कर्मचाऱ्यांना स्थान प्राधान्य पर्याय देण्याच्या सुविधांसह ऑनलाइन प्रक्रिया विकसित करणे समाविष्ट आहे. पत्रात म्हटले आहे की, महिला कर्मचाऱ्यांची शक्यतो जवळच्या ठिकाणी किंवा भागात बदली करण्यात यावी. ट्रान्सफर पॉलिसीच्या उल्लंघनाशी संबंधित तक्रारींचे काळजीपूर्वक निराकरण करण्यात यावे, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. बँकांना बढती किंवा प्रशासकीय कारणास्तव आवश्यक नसल्यास वर्षाच्या मधे ट्रान्सफर टाळून दरवर्षी जूनपर्यंत ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.