Fixed Vs Floating Interest Rate: छोटं किंवा मोठं असो पण आपलं घर असावं असं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. तो पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. कठोर परिश्रमानं, तो बँक किंवा गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून कर्ज घेतो, जेणेकरून त्याला घराचे स्वप्न पूर्ण करता येईल. बुधवारी झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कपात करण्यात आली. यावेळी सलग दुसऱ्यांदा रेपो दर कमी करण्यात आले. यानंतर रेपो दर ६ टक्क्यांवर आले असून आता कर्ज घेणाऱ्यांच्या खिशावरील ताण थोडासा कमी होणारे.
घर खरेदीसाठी दिलेल्या कर्जाला गृहकर्ज म्हणतात. यामध्ये बँकांकडून घराच्या हमीपोटी कर्ज दिलं जातं. या कर्जासाठी साधारणपणे दोन प्रकारच्या व्याज पद्धतींचा अवलंब केला जातो. यामध्ये, पहिला म्हणजे फिक्स्ड इंटरेस्ट आणि दुसरा म्हणजे फ्लोटिंग इंटरेस्ट रेट.
फिक्स्ड, फ्लोटिंग रेट म्हणजे काय?
फिक्स्ड इंटरेस्ट रेटमध्ये गृहकर्ज घेताना कर्जावर निश्चित केलेल्या व्याजदरानुसार व्याज भरावं लागतं, तर फ्लोटिंग व्याजदरामध्ये आरबीआय आणि बाजारानुसार व्याजदर वाढत किंवा कमी होत राहतो. सामान्यत: लोक गृहकर्जामध्ये फ्लोटिंग व्याजदराचा पर्याय निवडणं पसंत करतात. कारण सरकार, आरबीआय यांनी वेळोवेळी दिलेल्या सवलतींमुळे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी होतो. आरबीआयने नुकत्याच केलेल्या रेपो दरातील कपातीनंतर काही बँकांनी त्यांचे व्याजदर हळूहळू कमी करण्याचा निर्णयही घेतलाय. बँकांचा हा निर्णय कर्जदारांसाठी दिलासा देणारा आणि त्यांच्या खिशावरील ताण कमी करणारा ठरणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही फिक्स्ड व्याजदर घेतला असेल तर तुम्हाला व्याजदर कमी करून घेता येणार नाही. परंतु जर तुम्ही फ्लोटिंग रेटचा पर्याय स्वीकारला असेल तर तुम्हाला काही शुल्क भरुन तो कमी करून घेता येऊ शकतो.
फिक्स्ड रेट निवडण्याचे फायदे
जर तुम्ही कर्ज घेताना फिक्स्ड रेट निवडला तर तुमचा ईएमआय संपूर्ण लोन कालावधीसाठी सारखाच राहतो. अशा वेळी तुम्हाला तुमचं बजेट सांभाळणं सोपं जातं. दुसरीकडे, जर तुम्ही फिक्स्ड रेटमध्ये तुमच्या ईएमआयवर खूश असाल तर तुमच्यासाठी फिक्स्ड रेट निवडणं चांगलं. फिक्स्ड रेट निवडल्यानं येणाऱ्या काळात तुमचा ईएमआय वाढणार नाही. याशिवाय परिस्थितीनुसार दर निवडावा, म्हणजेच भविष्यात दर वाढतील असा अंदाज असेल तर तुम्ही फिक्स्ड रेट निवडा.
फ्लोटिंग रेट निवडण्याचे फायदे
फ्लोटिंग रेटचा पर्याय निवडल्यास आगामी काळात तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो. दुसरीकडे, जर आपल्याला दर कमी असण्याची अपेक्षा असेल तर आपण फ्लोटिंग रेट निवडू शकता. याशिवाय फ्लोटिंग रेट निवडल्यास कमी व्याजदरानं कर्जही मिळू शकतं. तसंच फ्लोटिंग रेट निवडून कर्जाची परतफेड केल्यास तुम्हाला प्रीपेमेंट चार्ज भरावा लागत नाही. फिक्स्ड रेटमध्ये तुम्हाला प्रीपेमेंट चार्ज द्यावा लागू शकतो.