तुमच्यापैकी अनेकांकडे क्रेडिट कार्ड असेल आणि ज्यांच्याकडे ते नसेल ते क्रेडिट कार्ड मिळवण्याच्या प्रयत्नातही असतील. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी तुम्हाला दररोज कोणत्या ना कोणत्या बँकेकडून कॉल येत असतील. जेव्हा एजंट लोकांना क्रेडिट कार्ड देण्यासाठी कॉल करतात तेव्हा ते त्यांना त्याचे सर्व फायदे सांगतात. तर काही जण तुम्हाला मोफत क्रेडिट कार्ड देत असल्याचं म्हणत तुम्ही जितका खर्च कराल तितके रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील असंही सांगतात.
अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्डावर वार्षिक शुल्कही आकारत नाहीत. म्हणजे मोफत कार्ड मिळणं, ज्यावर कोणतेही शुल्क आकारलं जात नाही, त्याशिवाय बँका रिवॉर्ड पॉइंट्सही देतात, ज्याचा ग्राहकांना फायदाही होतो. काही प्रीमियम कार्ड विमानतळ लाउंज अॅक्सेसदेखील देतात. आता प्रश्न असा पडतो की क्रेडिट कार्ड कंपन्या सर्व काही मोफत देत असताना मग कमाई कशी करत असतील?
अशी होते कंपन्यांची कमाई
क्रेडिट कार्ड कंपन्या कर्ज देण्याच्या बिझनेसप्रमाणे काम करतात. क्रेडिटटा अर्थ म्हणजे कर्ज. म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की या कंपन्यांना व्याजातूनही काही उत्पन्न मिळत असणार. व्याजाव्यतिरिक्त, क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. क्रेडिट कार्ड कंपनी पैसे कसे कमवते ते जाणून घेऊ.
व्याजातून कमाई
क्रेडिट कार्ड कंपन्या व्याजातून सर्वाधिक कमाई करतात. असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या क्रेडिट कार्डाची रक्कम वेळेवर परत करत नाहीत आणि त्यावर व्याज आकारलं जाते. क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे व्याज देखील ३० ते ५० टक्क्यांदरम्यान असू शकते. अनेक वेळा लोक ईएमआयवर वस्तू घेतात आणि त्यावर आकारण्यात येणाऱ्या व्याजातून पैसा मिळतो. ईएमआयवर वस्तू खरेदी करण्याच्या बाबतीत, व्याज दर फक्त १०-२० टक्क्यांदरम्यान राहतात.
असे बरेच लोक आहेत जे क्रेडिट कार्डमधून पैसे काढतात आणि त्यांना खूप मोठं व्याज देखील द्यावं लागतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की क्रेडिट कार्डमधून कोण पैसे काढत असेल, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते या वर्षी एप्रिलपर्यंत लोकांनी क्रेडिट कार्डाचा वापर करुन ३०० ते ४०० कोटी रुपये काढले आहेत.
याशिवाय अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या लोकांना कर्जाची सुविधाही देतात. या कर्जावर त्यांना व्याज मिळतं. हे व्याज १२ ते २४ टक्के इतकं आहे. क्रेडिट कार्ड युझर्सना कधीकधी कर्जाची आवश्यकता असते, अशा परिस्थितीत क्रेडिट कार्ड कंपनी अशा प्रकारे पैसे कमवते.
इंटरजेंच इन्कम
क्रेडिट कार्ड कंपन्यांसाठी कमाईचा दुसरा पर्याय म्हणजे इंटरचेंज इन्कम. जेव्हा जेव्हा एखादा ग्राहक क्रेडिट कार्डाने खरेदी करतो तेव्हा मर्चंट डिस्काऊंट रेट म्हणजेच MDR शुल्क व्यापाऱ्याकडून आकारलं जातं. हे शुल्क व्यवहाराच्या मूल्याच्या १-३ टक्के दरम्यान असते. एमडीआर शुल्क अनेक भागांमध्ये विभागलं गेलं आहे, ज्यामध्ये पेमेंट इकोसिस्टम, कार्ड ट्रान्झॅक्सन प्रोसेस करणारी बँत आणि कार्ड नेटवर्क यांचा समावेश असतो. यामध्ये, कार्ड जारी करणार्या कंपनीद्वारे इंटरचेंज शुल्क आकारलं जाते, त्यामुळे ते एकूण एमडीआरचा सर्वात मोठा भाग असते.
अनेकदा क्रेडिट कार्डासाठी आकारली जाणारी मेंबरशिप फी आणि जॉईनिंग फी पहिल्या वर्षासाठी मोफत असते. त्यानंतर ग्राहकांकडून ती आकारली जाते. तर क्रेडिट कार्ड कंपन्या बॅलन्स ट्रान्सफर फी, लेट पेमेंट फी, कॅश अॅडव्हान्स फी, फॉरेन ट्रान्झॅक्शन फी आणि काही अन्य शुल्कही आकारते.