SBI Home Loan Interest: काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं सामान्यांना दिलासा देत रेपो दर कमी होता. पतधोरण समितीच्या बैठकीत सलग दुसऱ्यांदा रेपो दरात कपात करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) रेपो दर ६.२५ टक्क्यांवरून ६.००% पर्यंत कमी केला आहे. त्यानंतर बँकांनीही आपले व्याजदर कमी करण्यास सुरुवात केलीये. या अंतर्गत देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या आरएलएलआर (रेपो लिंक्ड लोन किंवा लेंडिंग रेट) दरात ०.२५% कपात केली आहे. या बदलानंतर बँकेचा आरएलएलआर आता ८.२५ टक्क्यांवर आलाय.
या निर्णयाचा थेट फायदा एसबीआयच्या विद्यमान आणि नव्या दोन्ही कर्जदारांना होणार आहे. होम लोन असो, पर्सनल लोन असो किंवा ऑटो लोन असो, आता त्यावरील व्याज थोडं कमी होईल, म्हणजेच ईएमआयमध्ये दिलासा मिळू शकतो.
क्रिकेट की बिझनेस… IPL ची ब्रँड व्हॅल्यू ऐकून अवाक् व्हाल, या खेळात कसा खेचला जातोय पैसा?
एसबीआयने काय बदल केले?
स्टेट बँक ऑफ इंडियाने एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (ईबीएलआर) ०.२५ टक्क्यांनी कमी करून ८.६५ टक्के केला आहे. हा बदल १५ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आला आहे. ही कपात अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा आरबीआयनं सलग दुसऱ्यांदा रेपो दरात ०.२५% कपात केली आहे. अर्थात, एसबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
एफडीच्या व्याजदरात केलेत बदल
एकीकडे, एसबीआयनं कर्ज स्वस्त करून ग्राहकांना भेट दिली आहे. दुसरीकडे, मुदत ठेवींवरील व्याजदरही ०.१०%-०.२५% नं कमी करण्यात आलेत. नवीन दर आजपासून म्हणजेच १५ एप्रिलपासून लागू झाले आहेत. आता १ ते २ वर्षांच्या एफडीवरील व्याजदर ६.७०% असेल, जो पूर्वी ६.८०% होता. त्याच वेळी, २ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याज ७% वरून ६.९०% पर्यंत कमी करण्यात आलं आहे.
४ बँकांनी कमी केले व्याजदर
आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानं कर्जाच्या व्याजदरात कपात झाली आहे. एसबीआयसह पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि युको बँकेनं कर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.