बँका स्वत: ग्राहकांशी संपर्क करून ‘आमचे कर्ज घ्या’, असा प्रस्ताव ग्राहकास देतात. अशा प्रकारचे एसएमएस किंवा फोन तुम्हाला सातत्याने येत असतात. अनेकदा आधी एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर त्यांच्याकडूनही अशी ऑफर येत असते. या प्रकारच्या कर्जाला ‘पूर्वमंजूर कर्ज’ (प्रीअप्रूव्ह्ड लोन) असे म्हटले जाते. आर्थिक गरज असताना अशी ऑफर कुणी देत असेल तर तुमच्या फायद्याचेच ठरते. तुमची त्यावेळेची गरज यातून पूर्ण होणार असते.
बँकांना हवे असतात कर्जदार
आर्थिकदृष्ट्या मजबूत असलेल्या, आजवर आर्थिक व्यवहार न चुकता वेळेवर करणाऱ्या तसेच बँकिंग व्यवहार चांगला असणाऱ्या ग्राहकांना बँका अशी कर्जे देतात.
बँकिंग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे बँकांकडून पूर्वमंजूर कर्जे देण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. असे अधिकाधिक ग्राहक मिळावेत यासाठी बँका सातत्याने प्रयत्न करीत असतात. तुम्हालाही पूर्वमंजूर कर्ज मिळू शकते.
कोणाला मिळते प्रीअप्रूव्ह्ड लोन?
बँकांना ज्या ग्राहकांचा वित्तीय इतिहास पूर्णत: माहीत असतो, त्यांनाच पूर्वमंजूर कर्ज प्रस्तावित केले जाते. बँका स्वत: प्रस्ताव देत असल्या तरी काही अतिरिक्त कागदपत्रे बँका ग्राहकांकडे मागतात.
आयटीआर आणि उत्पन्नाचा पुरावा यांचा त्यात समावेश असतो. परतफेडीची विद्यमान क्षमता त्यातून बँका तपासतात.
या कर्जाचे फायदे काय?
या कर्जाचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे कर्जासाठी तुम्हाला बँकेत चकरा माराव्या लागत नाहीत.
तसेच कागदोपत्री औपचारिकताही पूर्ण करावी लागत नाही. व्याजदर आणि अटी-शर्तींबाबत वाटाघाटी करण्याची संधी ग्राहकांना यात असते.
हे कर्ज तुम्ही नाकारले तरी क्रेडिट स्कोअरवर परिणाम होत नाही.
तुम्ही कधी होणार या कर्जासाठी पात्र?
१. चांगला क्रेडिट स्कोअर ही पहिली पात्रता आहे.
२. कर्ज आणि हप्ते वेळेत फेडा, त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो.
३. तुम्हाला कर्ज इतिहास नसल्यास बँका तुमचे उत्पन्नाचे साधन आणि बचतीची माहिती घेतात.
घोटाळेबाज करतील फसवणूक, घ्या काळजी!
पूर्वमंजूर कर्जे संपर्कविहीन (कॉन्टॅक्टलेस) असतात. त्यामुळे घोटाळेबाज लोक व कंपन्या त्याचा फायदा घेऊन तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे पूर्वमंजूर कर्जाचा प्रस्ताव स्वीकारण्यापूर्वी पूर्ण चौकशी करून घ्या. विश्वसनीय बँकांकडूनच असे कर्ज प्रस्ताव स्वीकारावे.
प्रीअप्रूव्ह्ड लोनसाठी फोन किंवा मेसेज आलाय? थांबा.. आधी वाचा, ते घेणे किती आहे सुरक्षित
बँका स्वत: ग्राहकांशी संपर्क करून ‘आमचे कर्ज घ्या’, असा प्रस्ताव ग्राहकास देतात. अशा प्रकारचे एसएमएस किंवा फोन तुम्हाला सातत्याने येत असतात.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 11:26 AM2023-10-03T11:26:05+5:302023-10-03T11:27:42+5:30