लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात ३२.७ टक्के वाढ झाली आहे. बँकांनी लाभांशापोटी २७,८३० रुपये दिले. सरकारकडून दिलेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी आधीच्या वर्षी २०,९६४ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.
सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांनी २०२२-२३ मध्ये १.०५ लाख कोटींच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये १.४१ लाख कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा नोंदवला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा १.२९ लाख कोटी रुपये इतका होता. सरकारी बँकांनी २०१७-१८ मध्ये ८५,३९० कोटींचा विक्रमी तोटा झाला होता.
सरकारला १८,०१३ कोटी
लाभांशापैकी १८,०१३ कोटी रुपये (६५%) सरकारला हिस्सेदारीपोटी देण्यात आले. २०२२-२३ या आर्थिक वर्षात सरकारला स्टेट बँकेसह इतर बँकांकडून लाभांशाच्या स्वरूपात १३,८०४ कोटी मिळाले होते.
एसबीआयचा वाटा किती?
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एकूण १,४१,२०३ कोटी रुपयांच्या नफ्यात एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा वाटा ४० टक्केपेक्षा अधिक होता. एसबीआयने या वर्षात ६१,०७७ कोटी रुपयांचा नफा कमावला.
बँक ठेवी १०% वाढल्या
- देशभरातील बँकांनी दिलेल्या कर्जाचे प्रमाण ७ मार्च रोजी संपलेल्या पंधरवड्यापर्यंत वार्षिक आधारे ११.१ टक्क्यांनी वाढून २२५.१० लाख कोटींवर पोहोचले आहे तर ठेवी १०.२ टक्क्यांनी वाढून १८१.२८ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.
- मूल्याच्या दृष्टीने पाहिले तर बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जात १.३८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर ठेवींमध्ये २.२५ लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
- बँकिंग क्षेत्रातील तज्ञांच्या मते, रोखीची टंचाई आणि ठेवी गोळा करण्याच्या दबावामुळे बँका आक्रमक पद्धतीने कर्ज देण्यापासून सावधगिरी बाळगत आहेत. खासगी क्षेत्रातील मोठ्या बँका त्यांच्या कर्ज-ठेव गुणोत्तर कमी करण्यावर भर देतात.