Join us  

'या' सरकारी बँकेनं सुरू केली UPI ATM ची सुविधा, ६००० एटीएममध्ये विना कार्ड कॅश मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 1:17 PM

सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं आता ग्राहकांच्या सोयीसाठी युपीआय एटीएम सेवा सुरू केली आहे.

Bank Of Baroda UPI ATM : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदानं युपीआय एटीएम (UPI ATM) सेवा सुरू केली आहे. बँकेनं आपल्या ६००० एटीएमवर युपीआय एटीएम सुविधा सुरू केली आहे. ८ सप्टेंबर रोजी बँकेनं या नव्या सेवेची घोषणा केली. आता यूपीआयच्या मदतीनं या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. गेल्या आठवड्यात ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये UPI ATM सेवा लाँच करण्यात आली. हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं (Hitachi Payment Services) भारतात प्रथमच अशा प्रकारची बँकिंग सुविधा सुरू केली.

६ हजार एटीएमवर सुविधाबँक ऑफ बडोदानं जारी केलेल्या निवेदनानुसार, एनसीपीआयच्या (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे NPCI) सहकार्यानं युपीआय एटीएम सेवा सुरू करणारी ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहे. मोबाइल युपीआयच्या मदतीनं, त्याच्या आणि इतर बँकांचं ग्राहक डेबिट कार्डच्या मदतीशिवाय ६००० एटीएम नेटवर्कमधून कुठूनही पैसे काढू शकतात, असं बँकेनं स्पष्ट केलंय. युपीआय एटीएम सुविधेचा एक मोठा फायदा म्हणजे ग्राहक युपीआयशी जोडलेल्या विविध खात्यांमधून पैसे काढू शकतात.

कसा कराल वापरबँक ऑफ बडोदाचे युपीआय एटीएम वापरण्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रथम तुम्हाला "युपीआय कार्डलेस कॅश" पर्याय निवडावा लागेल जो एटीएम स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर रोख पैसे काढण्याचा पर्याय निवडा. त्यानंतर एक क्युआर कोड येईल, तो तुमच्या मोबाईल फोन युपीआय ​​अॅपवरून स्कॅन करा आणि तुमचं बँक खातं निवडा. पिनच्या मदतीने व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करा आणि तुम्हाला हवी असलेली रोख रक्कम काढली जाईल.

टॅग्स :बँकपैसा