कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या डोक्यावर कर्जाचं ओझं नको. डोक्यावर कोणतंही कर्ज नसेल तर आपलं आयुष्य किती चांगलं होईल. परंतु वाढती महागाई आणि गरजा यामुळे काही वेळा आपल्याला नाईलाजानं कर्ज घ्यावंच लागतं. काही खर्च असे असतात ज्यामुळे आपल्याला बँकेतून लोन घेण्याची गरज भासते. जसं की कार लोन, होम लोन, एज्युकेशन लोन किंवा आपात्कालिन परिस्थितीत पर्सनल लोन.
पण कर्ज घेताना दैनंदिन खर्चासह कर्जाची परतफेडही करावी लागेल, हेही ध्यानात ठेवणं आवश्यक आहे. कर्ज ही दीर्घकालीन कमिटमेंट असते, ज्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर लक्षणीय परिणाम होतो. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी तुमच्या पगाराचा किती भाग कर्जाच्या परतफेडीत जाईल, किती रक्कम तुमच्या दैनंदिन गरजांसाठी वापरली जाईल, किती पैसे तुमच्या बचत आणि गुंतवणुकीमध्ये जातील आणि इमर्नजन्सीसाठी पैसे आपल्याकडे असतील की नाही हेदेखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.
काय आहे सॅलरी आणि ईएमआयचा फॉर्म्युलातुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय आहे. पगारात, दर महिन्याला एक निश्चित रक्कम हातात येते, तर व्यवसायातही तुम्हाला जवळजवळ प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते. तुमच्या हातातील पगाराच्या किंवा व्यवसायातील मासिक उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 35 ते 40 टक्के कर्ज ईएमआयमध्ये गेले पाहिजेत.
कारण तुमच्या मासिक उत्पन्नाच्या जवळपास 60 टक्के रक्कम तुमचं राहणीमान, इतर दैनंदिन खर्च, गुंतवणूक, विमा आणि बचत यावर खर्च होते. ईएमआय ठरवताना, तुमच्या गरजेसाठी पुरेसा पैसा शिल्लक ठेवला पाहिजे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर तुमच्याकडे आपत्कालीन परिस्थितींसाठीही पैसा असला पाहिजे. अन्यथा, तुमच्यावर आर्थिक ताण वाढेल.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यायेणाऱ्या काळात करिअरमधील ग्रोथसह तुमचा पगारही वाढेल आणि तुम्ही अधिक ईएमआय भरण्याच्या स्थितीत असाल अशी परिस्थितीही होऊ शकते. अशा स्थितीतही तुम्हाला तुमचा ईएमआय एका मर्यादेत ठेवावा लागेल आणि उरलेले पैसे वाचवावे लागतील. जेणेकरून भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली तरी तुमच्यावर दबाव येणार नाही. परिस्थिती कोणतीही असली तरी तुम्हाला ईएमआय हा तर भरावाच लागणार आहे.
कर्ज घेताना फक्त तुमचे स्थिर उत्पन्न लक्षात ठेवा. कर्जाच्या कॅलक्युलेशनमध्ये इतर स्त्रोतांकडून येणारं अतिरिक्त उत्पन्न समाविष्ट करू नका.
आगामी काळात कर्जावरील ईएमआय वाढूही शकतो ही वस्तुस्थिती समजून घ्या. तसंच अशा परिस्थितीसाठी तुम्हाला तयारही राहावं लागेल.