Join us  

बँकेकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र घेतले का? कर्ज भरल्यानंतरही होऊ शकते फसवणूक...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 11:05 AM

अनेकांना फसवणुकीला तसेच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे...

- नारायण बडगुजर 

पिंपरी : ॲप लोन प्रमाणेच बॅंक किंवा वित्त संस्थांकउून कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड केली जाते. त्यानंतरही कर्ज थकल्याचे फोनवरून सांगत फसवणूक केली जाते. त्यामुळे कर्जाची परतफेड केल्यानंतर संबंधित बॅंक किंवा कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्थेकडून कर्ज फेडल्याचे प्रमाणपत्र (नो ड्यूज सर्टीफिकेट) घेणे आवश्यक आहे. मात्र, काही जण ते प्रमाणपत्र घेत नाहीत. परिणामी अनेकांना फसवणुकीला तसेच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

‘ॲप लोन’च्या प्रकरणांमध्ये कर्जाची परतफेड केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी केली जाते. त्याचप्रमाणे बॅंक किंवा इतर संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केल्यानंतरही कर्ज थकल्याचे फोन कर्जदारांना येतात. तसेच कर्जाची थकित रक्कम भरण्यासाठी तगादा लावला जातो. कर्जाची परतफेड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांनंतर असे फोन येतात. त्यामुळे अनेक जणांचा गोंधळ होतो. कर्ज फेडूनही हा त्रास कशासाठी, हे समजून येत नाही.

‘बोजा’ उतरविला का?

कर्जाची पूर्णपणे फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे. यात एनओसी, नोड्यूज सर्टिफिकेट घ्यावे. तसेच कर्ज घेताना तारण किंवा गहाण ठेवलेली मिळकत, वाहन, दागिने आदी सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित मिळकतीच्या कागदपत्रांवरील तारण ठेवल्याची नोंद कमी करण्याबाबत दुय्यम निबंधक किंवा संबंधित कार्यालयातील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला ‘बोजा उतरविणे’ असेही म्हणतात.  

वसुली एजंटकडून धमकी

नो ड्यूज केले नसल्यास अशा कर्जदारांकडे ‘हीडन चार्जेस’च्या नावाखाली आकारलेली रक्कम थकीत असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी काही बॅंक तसेच खासगी वित्त संस्थांकडून अशा कर्जाच्या वसुलीसाठी काही एजंटची नियुक्ती केली जाते. अशाच एका एजंटने शहरातील एका कर्जदाराला फोन केला. कर्ज थकले आहे. ती रक्कम भरा नाही तर, आम्ही आमच्या स्टाईलने वसूल करू, अशी धमकी दिली. मात्र, कर्जाची पूर्ण रक्कम दिली असल्याचे त्यांनी एजंटला सांगितले. त्यानंतरही एजंटने शिवीगाळ केली.

पावणेदोन लाखांची केली फसवणूक

दिघी येथील एका व्यक्तीला फोन आला. फायनान्स कंपनीची कर्जाची थकीत रक्कम भरा, असे फोनवरून त्याला सांगण्यात आले. रक्कम भरण्यासाठी फोन करणाऱ्या  आरोपीने त्याच्याकडील एका खात्याची माहिती दिली. तसेच रक्कम भरण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे दिघी येथील व्यक्तीने एक लाख ७१ हजार रुपये संबंधित बॅंक खात्यात भरले. मात्र, फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल केला.

टॅग्स :पुणेबँकिंग क्षेत्र