HDFC Home Loan Interest Rate: देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसीच्या ग्राहकांना दिवाळीनंतर झटका बसला आहे. एचडीएफसीनं ठराविक कालावधीच्या कर्जावरील एमसीएलआरमध्ये वाढ केलीये. जर तुम्ही कार किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला महागडं कर्ज मिळेल. म्हणजेच कर्जावरील व्याज पूर्वीपेक्षा जास्त भरावं लागणार आहे. याशिवाय ज्यांचं आधीच कर्ज सुरू आहे, त्यांच्या मासिक कर्जाचा ईएमआय वाढणार आहे. एचडीएफसी बँकेनं एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांची वाढ केलीये.
एमसीएलआरमध्ये बदल केला
बँकेच्या एमसीएलआरमधील बदलांमुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग लोनच्या ईएमआयवर परिणाम होतो. एमसीएलआर वाढला की कर्जाचं व्याज वाढतं आणि विद्यमान ग्राहकांचा ईएमआय वाढतो. हे नवे दर ७ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाले आहेत. एचडीएफसी बँकेनं सहा महिने आणि तीन वर्षांच्या कालावधीत एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्के वाढ केली आहे. फंड बेस्ड लेंडिंग रेट एमसीएलआर बेंचमार्क मार्जिनल कॉस्ट ९.१५% ते ९.५०% दरम्यान आहे.
एचडीएफसी बँकेचे नवे एमसीएलआर दर
- एचडीएफसी बँकेचा एमसीएलआर ९.१० टक्क्यांवरून ९.१५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
- एका महिन्यात एमसीएलआर ९.१५ टक्क्यांवरून ९.२० टक्क्यांवर गेलाय.
- तीन महिन्यांचा एमसीएलआर ९.३० टक्के असून त्यात बदल करण्यात आला नाही.
- तर सहा महिन्यांचा एमसीएलआर ९.४५ टक्के आहे. त्यातही बदल करण्यात आला नाही.
- एक वर्षाचा एमसीएलआर ९.४५ टक्के आहे. त्यात बदल करण्यात आला नाही.
- २ वर्षांहून अधिक काळासाठी एमसीएलआर ९.४५ टक्के आहे. त्यातही बदल करण्यात आला नाही.
- ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर ९.५० टक्के आहे. त्यात बदल करण्यात आला नाही.