आजपासून एचडीएफसी लिमिडेटचं (HDFC Ltd) एचडीएफसी (HDFC) बँकेत विलीनीकरण झालं आहे. याला शुक्रवारी दोन्ही मंडळांकडून मंजुरी मिळाली. एचडीएफसी ही देशातील पहिली हाऊसिंग फायनॅन्स कंपनी होती, ज्याची स्थापना 44 वर्षांपूर्वी हसमुखभाई पारेख यांनी केली होती. 1 जुलै ही विलीनीकरणाची तारीख आहे, तर 13 जुलै ही भागधारकांसाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे. या डील अंतर्गत एचडीएफसीच्या प्रत्येक शेअरहोल्डरला प्रत्येक 25 शेअर्समागे एचडीएफली बँकेचे 42 शेअर्स मिळतील. एनसीडी म्हणजेच नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर हस्तांतरित करण्याची तारीख 12 जुलै निश्चित करण्यात आली आहे. कमर्शिअल पेपर हस्तांतरित करण्यासाठी 7 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
40 अब्ज डॉलर्समध्ये डील
हे एक ऐतिहासिक रिव्हर्स मर्जर आहे. ज्यामध्ये मूळ कंपनी एचडीएफसीचं एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झालंय. एचडीएफसी बँकेचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील 40 अब्ज डॉलर्स मूल्याचा सर्वात मोठा व्यवहार आहे. या विलीनीकरणानंतर कम्बाईन्ड असेट्स 18 लाख कोटी रुपये झालेत.
बीएसई वेटेज 14 टक्क्यांवर
बीएसई निर्देशांकात आता एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक वेटेज आहे. सध्या, बीएसई निर्देशांकात रिलायन्स इंडस्ट्रीजचे 10.4 टक्क्यांसह सर्वाधिक वेटेज आहे. विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे वेटेज 14 टक्क्यांच्या जवळपास पोहोचेल. मार्केट कॅपच्या बाबतीत एचडीएफसीनं स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेला मागं टाकलं आहे.
41 लाख कोटींचा व्यवसाय
विलीन झालेल्या संस्थेबद्दल सांगायचं झाल्यास, एचडीएफसी बँकेचा एकूण व्यवसाय 41 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. तर एकूण संपत्ती 4.14 लाख कोटी रुपये झाली. ही आकडेवारी 31 मार्च 2023 च्या डेटावर आधारित आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकत्रित नफा 60 हजार कोटी रुपये होता.
जगातील चौथी सर्वात मोठी बँक
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँक इक्विटी मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे. जेपी मॉर्गन, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, बँक ऑफ अमेरिका कॉर्प यांच्यानंतर एचडीएफसी बँकेचा नंबर येतो. याचं व्हॅल्युएशन 172 बिलियन डॉलर्स झालं आहे. ही एचएसबीसी, सिटीग्रुपपेक्षाही मोठी बँक बनली आहे.
जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त ग्राहक
विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँकेची ग्राहकसंख्या 120 मिलियन म्हणजेच 12 कोटींवर पोहोचली आहे. ही संख्या जर्मनीच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. शाखांचे जाळं 8300 पर्यंत पोहोचणार आहे, तर कंपनीसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 1.77 लाखांवर पोहोचेल.