Join us  

होम लोन असो किंवा FD, युनियन बँक देतेय बेस्ट ऑफर अन् सुरक्षेची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 12:59 PM

गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं रेपो दरात वाढ केली आहे. परंतु ही बँक ग्राहकांना स्पर्धात्मक दरानं व्याजदर देत आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली. रेपो दरात तब्बल २.५ टक्क्यांची वाढ होऊन ते ६.५० टक्क्यांवर गेले. यानंतर अनेक बँकांनी आपल्या होम लोनचे व्याजदर वाढवले. तर दुसरीकडे बँकांनी जमा रकमेवर व्याजदर वाढवले आहेत. हेच कारण आहे ज्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये बचत खाती आणि एफडीवरील व्याजदर वाढवण्यात आले आहेत. अशातच युनियन बँक ऑफ इंडिया ही सरकारी बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. तर अन्य बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक दरात होम लोनही दिलं जात आहे.

युनियन बँक ऑफ इंडियानं २५ नोव्हेंबर २०२२ रोजी एफडीवरील व्याजदरात अखेरची वाढ केली होती. युनियन बँक ऑफ इंडिया ८०० दिवस आणि ३ वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज दर देत आहे. या कालावधीसाठी गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ७.८० टक्के व्याज दिलं जात आहे. त्याच वेळी, सुपर सीनिअर सिटिझन्स या कालावधीसाठी ८.०५ टक्के व्याजदराचा लाभ घेऊ शकतात.

बचत खात्यावर किती व्याज?युनियन बँक ऑफ इंडिया ५० लाख रुपयांच्या बचतीवर २.७५ टक्के आणि ५० लाख आणि १०० कोटी रुपयांपर्यंतच्या ठेवींवर २.९० टक्के व्याज देत आहे. १०० कोटींहून अधिक रकमेवर ३.१० टक्के व्याज दिलं जात आहे. ५०० कोटींहून अधिक रकमेवर ३.४० टक्के वार्षिक व्याज दिलं जातंय., तर १ हजार कोटींच्या रकमेवर सर्वाधिक ३.५५ टक्के व्याज दिलं जात आहे.

होम लोनचे व्याजदर किती?गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात मोठी वाढ केली आहे. त्यानंतर युनिअन बँकेच्या कर्जाच्या व्याजदरातही वाढ झाली आहे. असं असलं तरी बँक स्पर्धात्मक व्याजदरात होम लोन उपलब्ध करून देत आहे. युनिअन बँक ८.६० टक्के व्याजदरानं होम लोन देत आहे. परंतु हे व्याजदर तुमच्या सिबिल स्कोअरवर अवलंबून असतील. जर तुमचा सिबिल ८०० किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला ८.६० टक्के व्याजदरानं कर्ज मिळेल. जर तुमचा सिबिल ७५० ते ७९९ दरम्यान असेल तर तुम्हाला ८.७० टक्के व्याजदरानं कर्ज मिळेल. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधू शकता किंवा बँकेच्या संकेतस्थळावरून माहिती घेऊ शकता.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक