चंद्रकांत दडस, उपसंपादक
लाखो रुपये वाचतात... : जेव्हा आपण प्रत्येक महिन्याला नियमित ईएमआय भरण्याव्यतिरिक्त प्रीपेमेंट म्हणून बँकेत एकरकमी रक्कम जमा करतो, तेव्हा कर्जाच्या मूळ रकमेतून रक्कम वजा केली जाते. यामुळे मूळ रक्कम कमी होते. प्रीपेमेंटने आपण कर्जाची वेळेपूर्वी परतफेड करतोच शिवाय लाखो रुपयांचे व्याजही वाचवतो. मूळ रक्कम कमी केल्यामुळे ईएमआयदेखील कमी होतो. असे केल्याने क्रेडिट स्कोअरही वाढतो. प्रीपेमेंट केल्यामुळे कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास पूर्णपणे सक्षम आहे, असे मानले जाते. भविष्यात कर्ज घेण्याची गरज भासल्यास ते सहज उपलब्ध होते. यात कोणतीही समस्या येत नाही.
गृहकर्ज घेतले की, ते १०, २० ते ३० वर्षांपर्यंत चालते. कर्जाची परतफेड लवकरात लवकर व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण अनेकदा गृहकर्जाचे प्रीपेमेंट करतो. त्याचे फायदे नक्कीच आहेत; पण काही वेळा नियोजनाच्या अभावामुळे इतर तोटेही होतात. गृहकर्जामध्ये प्रीपेमेंटचे फायदे तोटे नेमके काय ते जाणून घेऊ.