Join us  

सॅलरीच्या हिशोबानं किती महागडी कार खरेदी करावी? जाणून घ्या गणित, अन्यथा बिघडेल बजेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 2:20 PM

अनेकदा लूक आणि फीचर्समुळे आकर्षित होऊन, आपण आपल्या बजेटच्या बाहेरचीही कार खरेदी करण्याचा विचार करतो आणि बजेट गडबडतं.

आजकाल, सातत्यानंच वेगवेगळ्या फीचर्स आणि लूक असलेल्या कार लाँच केल्या जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याकडे आपणही आकर्षित होतो आणि एखादी कार खरेदी करण्याचं मन तयार करतो. अनेक वेळा, लूक आणि फीचर्समुळे आकर्षित होऊन, आपण आपल्या बजेटच्या बाहेरचीही कार खरेदी करण्याचा विचार करतो. साहजिकच आपली ही आवड पूर्ण करण्यासाठी आपल्याला बँकांकडे जावं लागतं आणि नंतर मोठ्या रकमेचं कर्जही घ्यावं लागतं. मोठ्या रकमेमुळे हप्ताही मोठा होतो आणि या प्रकरणात बजेट ट्रेन रुळावरून घसरते.

तुम्हाला या समस्या टाळायच्या असतील तर तुमच्या बजेटनुसार कार खरेदी करा. जर तुम्हाला यात काही शंका असेल इथे दाखवत असलेल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्ही तुमच्या पगाराच्या हिशोबानं ते सहज निश्चित करू शकाल. यामुळे तुमची कारची आवड आणि गरजही पूर्ण होतील, तुमचं बजेटही विस्कळीत होणार नाही.

निम्म्या पॅकेजपेक्षा जास्त किंमतीची कार नकोतुम्ही कार खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा तुमच्या कारची किंमत तुमच्या वार्षिक पॅकेजच्या निम्म्यापेक्षा जास्त नसावी. समजा तुमचे पॅकेज १० लाखांचं असेल तर कारची किंमत ५ लाखांपर्यंत खरेदी करता येईल. जर तुमचं पॅकेज १५ लाखांचं असेल तर तुम्ही ७.५ लाखांपर्यंतची कार खरेदी करू शकता. जर तुमचं पॅकेज २० लाखांचं असेल तर तुम्ही १० लाखांपर्यंतची कार खरेदी करू शकता. कारचं बजेट म्हणजे तुमच्या कारची ऑन-रोड किंमत. याशिवाय, कार खरेदी करताना, तुम्ही डाउन पेमेंट, कर्जाची रक्कम आणि ईएमआयचं कॅलक्युलेशन देखील केलं पाहिजे.

हा फॉर्म्युला येईल कामीकार खरेदी करताना नेहमी २०/४/१० फॉर्म्युला कायम लक्षात ठेवा. यामध्ये २० म्हणजेच २० टक्के डाउन पेमेंट आहे. म्हणजे तुमच्या कारचे डाउन पेमेंट तुमच्या वार्षिक पगाराच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त नसावं. याशिवाय, फॉर्म्युलामध्ये ४ म्हणजे ४ वर्षे, म्हणजेच कर्जाचा कालावधी ४ वर्षांपेक्षा जास्त नसावा. अखेर १० म्हणजे १० टक्के, म्हणजेच ईएमआयची रक्कम वार्षिक निम्म्या पगाराच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही तुमची कार या फॉर्म्युल्यानुसार खरेदी केली तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये कधीही कोणतीही अडचण येणार नाही.

टॅग्स :कारव्यवसायबँक