Bank Safety Rules : आर्थिक व्यवहार करणाऱ्या बहुतांश सज्ञान लोकांचं कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असतेच. ग्रामीण भागात पतपेढी, जिल्हा सहकारी बँक ते शहरी भागात राष्ट्रीयकृत बँकेपर्यंत विविध प्रकार पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची प्रकरणे उघडकीस आली. यामध्ये लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले होते. अशा परिस्थितीत देशातील कोणतीही बँक बुडाली तर तुमच्या पैशांचं काय होतं? ते पुन्हा मिळतात का? याविषयी माहिती आहे का?
बँक बुडली तर किती पैसे मिळतात?
जर काही कारणास्तव तुमचे खाते असलेली कुठलीही बँक बुडाली तर नियमांनुसार तुम्हाला जास्तीत जास्त ५ लाख रुपयेच मिळतात. तुमच्या बँक खात्यात यापेक्षा जास्त रक्कम जमा असली तरीही. ही प्रक्रिया जवळपास सर्व सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये सारखीच आहे. देशात ४ फेब्रुवारी २०२० पूर्वी, बँक ठेवींवर फक्त १ लाख रुपयांचा विमा होता. परंतु, २०२० मध्ये हा नियम बदलण्यात आला आणि ठेव विमा संरक्षण १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आले.
विम्याची रक्कम ९० दिवसांत मिळते
ठेव विमा प्रणालीमध्ये बचत खाते, चालू खाते, आवर्ती खाते यासह सर्व प्रकारच्या ठेवींचा समावेश होतो, ज्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर विमा संरक्षण दिले जाते. विशेष बाब म्हणजे या नियमानुसार बँक बुडाल्यास खातेदारांना ९० दिवसांच्या आत विम्याचे पैसे मिळतात. नियमानुसार, अडचणीत असलेली बँक पहिल्या ४५ दिवसांत विमा महामंडळाकडे सोपवली जाते. ठरावाची वाट न पाहता ९० दिवसांत प्रक्रिया पूर्ण होते.
गेल्या काही वर्षांत येस बँक, लक्ष्मी निवास बँक आणि पीएमसी बँकेची आर्थिक स्थिती ढासळली होती. मात्र, सरकारच्या मदतीमुळे त्यांची यातून सुटका झाली. तसेच, RBI बँकांवर बारीक नजर ठेवते. कारण RBI प्रत्येक बँकेच्या कर्जावर आणि व्यवहारांवर बारीक नजर असते.
तुम्ही एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये तुमच्या नावाने खाती उघडली असतील, तर सर्व खाती एकच मानली जातील. या सर्वांची रक्कम जोडली जाईल आणि एकत्र घेतलेली रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर खात्यात जमा असलेली रक्कम दिली जाते. जर जमा केलेली रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर फक्त ५ लाख रुपये दिले जातात.
एफडी आणि इतर योजनांचे नियम काय आहेत?
जर तुम्ही बँकेत एफडी केली असेल आणि बचत खाते किंवा आवर्ती खाते किंवा इतर कशातही पैसे गुंतवले असतील, तर सर्व रक्कम जोडून तुम्हाला कमाल ५ लाख रुपये दिले जातील. सर्व रक्कम जोडल्यानंतर रक्कम 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास, फक्त जमा केलेली रक्कम दिली जातो. परंतु, जर ही रक्कम ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.