Join us

बँकांमधील तुमची गुंतवणूक किती सुरक्षित, सरकार देते का गँरंटी? नियम जाणून पायाखालची जमीनच सरकेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 3:23 PM

लोक बँक खात्यात लाखो रुपये ठेवतात. त्यांच्या लाखो रुपयांच्या एफडीही असतात. एवढी मोठी रक्कम गुंतवताना प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट असते की, त्यावर सरकारी गॅरंटी मिळाल्यानं त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. पाहूय काय म्हणतो नियम?

आजच्या काळात प्रत्येकाचं बँक खातं नक्कीच असेल. लोक या खात्यात लाखो रुपये ठेवतात. त्यांच्या लाखो रुपयांच्या एफडीही असतात. एवढी मोठी रक्कम गुंतवताना प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट असते की, त्यावर सरकारी गॅरंटी मिळाल्यानं त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. पण समजा ज्या बँकेत तुम्ही पैसे जमा केले आणि ती बँक बुडते किंवा दिवाळखोर होते, तर तुमच्या पैशाचे काय होईल? बँक तुमची संपूर्ण रक्कम परत करेल का? आपल्या सर्वांची अनेक बँकांमध्ये खाती आहेत, पण बँकेतील ठेवींच्या संरक्षणासाठी बनवलेले नियम कदाचित काही लोकांना माहित असतील. जर तुम्हाला हे नियम माहित नसतील तर ते नक्की समजून घ्या.

फक्त इतक्या रकमेची हमी

बँक कोणत्याही स्थितीत डिफॉल्ट झाल्यास गुंतवणूकदारांच्या केवळ पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत. बँकेकडे यापेक्षा जास्त पैसे असतील तर ती बुडेल. कारण डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) केवळ ५,००,००० रुपयांपर्यंतच्या बँक ठेवींवर विमा गॅरंटी देते. डीआयसीजीसी ही भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

डीआयसीजीसी देशातील बँकांचा विमा उतरवते. या विम्याची रक्कम ग्राहकाकडून घेतली जात नाही. यासाठी ग्राहकानं ज्या बँकेत पैसे जमा केले आहेत, त्या बँकेकडून प्रीमियम जमा केला जातो. मात्र, हा प्रीमियम खूपच कमी आहे. यापूर्वी या कायद्यानुसार बँक बुडल्यास किंवा दिवाळखोरी झाल्यास एक लाख रुपयांपर्यंत ची रक्कम दिली जात होती, मात्र नंतर सरकारने ती वाढवून ५ लाख केली. भारतात शाखा असलेल्या परदेशी बँकाही त्याच्या अखत्यारित येतात.

कोणत्या बँकांना लागू होते योजना?

भारतातील सर्व व्यापारी बँका (परदेशी बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका) या सर्वांना ठेवींवर ५ लाख रुपयांच्या विम्याची हमी आहे. पण सहकारी संस्था या कक्षेबाहेर आहेत. परंतु डीआयसीजीसी अंतर्गत मिळणाऱ्या विम्यावर जास्तीत जास्त पाच लाख रुपये मिळतील, ज्यात मुद्दल आणि व्याजाचा समावेश असेल.

एकाच बँकेच्या दोन खात्यांमध्ये रक्कम असल्यास?

जर तुमचं खातं दोन बँकांमध्ये असेल आणि दोन्ही बँका बुडल्यास, अशा परिस्थितीत तुम्हाला दोन्ही बँकांकडून ५-५ लाख रुपये मिळतात. परंतु जर तुम्ही तुमच्या नावानं एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये खाती उघडली असतील तर अशी सर्व खाती एक मानली जातील आणि एकत्र मिळून तुम्हाला जास्तीत जास्त ५ लाख रुपये दिले जातील. ही रक्कम ५ लाखांपेक्षा जास्त असली तरी केवळ ५ लाख मिळणार आहेत. पाच लाखांहून अधिक रकमेचं नुकसान होईल.

एफडी, अन्य स्कीमसाठी काय नियम?

पाच लाख रुपयांच्या विमा रकमेत बँकेतील कोणत्याही प्रकारच्या ठेवीचा समावेश आहे. म्हणजे बँकेच्या बचत खात्यात, एफडी, आरडी किंवा इतर कोणत्याही योजनेत जमा झालेली रक्कम, सर्व ठेवी जोडल्या जातात. यानंतर जास्तीत जास्त ५ लाखापर्यंत रक्कम दिली जाते. जर तुमच्या सर्व ठेवी ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वरच्या रकमेचा तोटा सहन करावा लागेल.

किती दिवसात मिळते रक्कम?

बँक कोसळल्यास किंवा बंद पडल्यास डीआयसीजीसी ४५ दिवसांच्या आत ग्राहकांच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती गोळा करते. त्यानंतर तपासणी करून पुढील ४५ दिवसांत ही रक्कम ग्राहकाला दिली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे ९० दिवस म्हणजे तीन महिने लागतात.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकपैसा