Gold Loan Tips : जेव्हा सगळीकडून तुमची आर्थिक कोंडी होते, बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग समोर नसतो. अशावेळी घरातील सोने देवदुतासारखे काम करते. सर्वात वेगवान आणि कमी कागदपत्रांमध्ये कुठलं कर्ज मिळत असेल तर ते सोनेतारण कर्जच असेल. सध्या बाजारात गोल्ड लोन देणाऱ्या ढिगभर वित्तीय संस्था आणि बँका पाहायला मिळतात. अनेक संस्थांकडून आकर्षक व्याजदराची ऑफर दिली जाते. तुम्हीही सोनेतारण कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर थांबा, घाई करू नका. सुवर्णकर्ज घेण्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.
तुमच्या तारण ठेवलेल्या सोन्यासाठी तुम्हाला अनुकूल अटी, वाजवी व्याजदर आणि सुरक्षेची हमी याची खात्री करण्यासाठी योग्य संस्था निवडणे फार महत्त्वाची असते. कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर, परतफेड पर्याय आणि देणाऱ्याची विश्वासार्हता यासारख्या घटकांचे काळजीपूर्वक मूल्यमापन करूनच निर्णय घेतला पाहिजे.
गोल्ड लोन म्हणजे काय?गोल्ड लोन हा कर्जाचा सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये कर्जदार वित्तीय संस्थेकडून कर्ज मिळविण्यासाठी त्यांचे सोने तारण ठेवतो. कर्जाची रक्कम ही सामान्यतः सोन्याच्या वर्तमान बाजार मूल्याची टक्केवारी असते, ज्याला कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर म्हणून ओळखले जाते. सुवर्णकर्ज हे जलद प्रक्रिया, किमान कागदपत्रे आणि परतफेडीच्या पर्यायांमध्ये लवचिकता असल्यामुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे. हे सहसा मेडीकल इमर्जन्सी, शैक्षणिक खर्च किंवा वैयक्तिक गरजा यासारख्या अल्पकालीन आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले जाते.
सुवर्ण कर्ज घेताना काय काळजी घ्याल?
- सुवर्णकर्ज घेताना विविध वित्तीय संस्थांद्वारे देऊ केलेल्या व्याजदरांची तुलना करणे महत्त्वाचे आहे. वाजवी व्याजदरांसाठी चर्चा केली तर तुमचा नंतरचा भार हलका होऊ शकतो.
- तुम्ही तुमच्या सोन्याच्या किमतीच्या तुलनेत किती रुपयांचे कर्ज घेऊ शकता हे लोन-टू-व्हॅल्यू रेशो ठरवतो. उच्च कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर म्हणजे तुम्हाला अधिक पैसे मिळू शकतात. मात्र, यासाठी नियम व अटी कठोर असू शकतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी वित्तीय संस्थाच निवडा.
- तुम्हाला परतफेडीसाठी लवचिक पर्याय देणारी संस्था मिळाली तर कर्ज लवकर फेडण्यास मदत होते. भिन्न कालावधी किंवा आंशिक पेमेंट करण्याची क्षमता असेल तर तुम्हाला प्रभावीपणे परतफेड करण्यास मदत होते.
गोल्ड लोन घेण्यापूर्वी हा प्रश्न स्वतःला विचारागोल्ड लोन घेण्यापूर्वी एक प्रश्न स्वतःला विचारालाच पाहिजे. सुवर्णकर्जाची खरच तुम्हाला आवश्यकता आहे का? तुम्ही कर्ज अल्पकालीन गरजेसाठी घेत आहात की दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, याचे स्पष्ट उत्तर तुमच्याकडे आहे का? हे कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे योग्य व्यवस्थापन आहे का? तिसरे म्हणजे तुम्हाला व्याजदर वाढण्याची अपेक्षा आहे का? या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला खरच गोल्ड लोन घ्यावे का? हा निर्णय घेताना मदत करेल.