Petrol pump license : रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहने आणि जैवइंधनावर चालणारी वाहनेही बाजारात येत आहेत. मात्र, देशाचं धोरण पाहता पेट्रोल डिझेलवरील वाहने पूर्णपणे बंद होणार नाहीत. त्यामुळे इधनाची मागणी कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे पेट्रोल पंप हा एक चांगला व्यवसाय आहे आणि तो सुरू करून चांगले पैसे कमावता येतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय दिवाळखोरीत निघाले, पण त्यावेळीही पेट्रोल पंप सुरूच होते. तुम्हालाही पेट्रोल पंप उघडायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
पेट्रोल पंप उघडण्याचे काम पेट्रोलियम कंपन्या करतात. त्यासाठी कंपन्या परवाने देतात. नवीन भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी तेल कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. आजकाल तुम्हाला पेट्रोल पंपावर CNG देखील मिळतो. भविष्यात, पंपांवर चार्जिंग स्टेशन्स बसवण्याचीही शक्यता आहे. कारण देशात पेट्रोल पंपांचे जाळे खूप मोठे आहे.
पेट्रोल पंप कोण उघडू शकतो?
देशातील BPCL, HPCL, IOCl, Reliance, Essar Oil सारख्या सार्वजनिक आणि खाजगी तेल कंपन्यांकडून पेट्रोल पंप उघडण्यासाठी परवाने जारी केले जातात. पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुमचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ६० वर्षे असावे. सामान्य श्रेणीतील अर्जदार १२वी उत्तीर्ण असावेत, तर SC/ST/OBC श्रेणीतील अर्जदार किमान १०वी उत्तीर्ण असावेत. त्याचबरोबर शहरी भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी अर्जदार पदवीधर असणे बंधनकारक आहे.
किती जागा आवश्यक आहे?
पेट्रोल पंप उघडण्यासाठी जागेचा नियम स्थळानुसार बदलतो. जर तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्ही भाड्याने घेऊन पेट्रोल पंप उघडू शकता. यासाठी तुमच्याकडे भाड्याने घेतलेल्या जागेचा करार असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल पंप उघडायचा असेल तर तुम्हाला १२०० चौरस मीटर ते १६०० चौरस मीटर आवश्यक असते.
लायसन्स मिळवण्यासाठी किती खर्च येतो?
शहर असो वा गाव, पेट्रोल पंप उघडण्यासाठी परवाना आवश्यक आहे. तुम्हालाही पेट्रोल पंप उघडण्याचा परवाना घ्यायचा असेल, तर तुम्ही विविध सरकारी आणि खासगी पेट्रोलियम कंपन्यांमार्फत ते मिळवू शकता. देशातील विविध ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याच्या योजनांची माहिती देण्यासाठी तेल विपणन कंपन्या वेळोवेळी जाहिराती प्रसिद्ध करत असतात. या कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्जदार पेट्रोल पंप डीलरशिपसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुम्ही पेट्रोल पंप उघडण्याबाबत इंडियन ऑइलच्या संबंधित रिटेल विभागीय कार्यालय/फील्ड ऑफिसरशी देखील संपर्क साधू शकता. तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील इंडियन ऑइल रिटेल आउटलेट्स (पेट्रोल पंप) वर त्यांची माहिती मिळेल.
अर्जासाठी किती फी भरावी लागते?
तुम्ही पेट्रोल पंप डीलरशिपसाठी ऑनलाइन नोंदणी केल्यास, तुम्हाला नोंदणी शुल्क भरावे लागते. विविध श्रेणींसाठी वेगवेगळे नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सामान्य श्रेणीतील लोकांना पेट्रोल पंप डीलरशिप नोंदणी शुल्क ८००० रुपये भरावे लागते. त्याचवेळी, मागासवर्गीयांसाठी पेट्रोल पंप डीलरशिप नोंदणी शुल्क ४००० रुपये आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी, पेट्रोल पंप नोंदणी शुल्क २००० रुपये आहे. यात वेळोवेळी बदल होत असतात.
पेट्रोल पंप उघडण्यासाठी किती खर्च येतो?
जर तुम्हाला ग्रामीण भागात पेट्रोल पंप उघडायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला १५ ते २० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यातील ५ टक्के रक्कम कंपनी तुम्हाला परत करते. शहरी भागात पेट्रोल पंप उघडण्यासाठी ३० ते ३५ लाख रुपये खर्च येतो. पेट्रोल पंप उघडण्यासाठी मुख्य रस्त्यालगत जमीन असणे आवश्यक आहे. जेणेकरून वीज सहज पोहोचू शकेल. या व्यतिरिक्त बांधकाम आणि इतर गोष्टींसाठी येणारा खर्च वेगळा आहे. काही खासगी कंपन्या तुम्हाला बांधकामासह सर्व सुविधा उपलब्ध करुन देतात. यासाठी जवळपास २ कोटी रुपये गुंतवावे लागू शकतात.