ICICI Bank : भारतीय UPI चा जगभरात डंका वाजतोय. विविध देशांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, इतर अनेक देशही त्यांच्याकडे ही सेवा सुरू करू इच्छितात. याच पार्श्वभूमीवर ICICI बँकेने परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ICICI बँकेचे NRI ग्राहक आता भारतात UPI पेमेंटसाठी त्यांचे आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर वापरू शकतील.
युटिलिटी बिल सहज भरता येणार
आयसीआयसीआय बँकेने सोमवारी सांगितले की, एनआरआय ग्राहक आता वीज आणि पाणी यांसारखी युटिलिटी बिले सहज भरू शकतील. याशिवाय व्यापारी आणि ई-कॉमर्स व्यवहारही करता येतील. यासाठी ते नोंदणीकृत आंतरराष्ट्रीय बँक क्रमांक आणि ICICI बँकेच्या NRO अकाउंटचा वापर करू शकतील. बँकेने आपल्या मोबाईल बँकिंग ॲप iMobile Pay द्वारे ही सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत अनिवासी भारतीयांना यूपीआय पेमेंटसाठी त्यांच्या भारतीय मोबाइल क्रमांकांची नोंदणी करावी लागत होती.
ही सेवा 10 देशांमध्ये सुरू
बँकेने सांगितले की, ही सेवा सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधांचा लाभ घेतला आहे. बँक ही सेवा 10 देशांमध्ये पुरवणार आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, यूएई, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, ओमान, कतार आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे. आता बँकेचे अनिवासी भारतीय ग्राहक कोणताही भारतीय QR कोड स्कॅन करून व्यवहार करू शकतील.