Join us

Loan Recovery Rules : Loan घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कोणाकडून वसुली करते बँक, कोणाला भरावे लागतात पैसे; काय आहे नियम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:03 IST

Loan Recovery Rules : बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराला ते ईएमआयच्या स्वरूपात भरावं लागतं. पण तुम्ही विचार केलाय का की कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर थकीत कर्ज कोणाला भरावं लागतं? अशा परिस्थितीत कर्ज वसुलीसाठी बँका काय करतात?

Loan Recovery: आजच्या काळात गरजा भागविण्यासाठी कर्ज घेण्याकडे कल झपाट्यानं वाढत आहे. सहसा लोक घर किंवा कार खरेदी करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतात. देशातील सर्वच बँका आपल्या ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर आणि परतफेडीचा इतिहास लक्षात घेऊन कर्जावर विविध प्रकारच्या ऑफर्स देतात. बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराला ते ईएमआयच्या स्वरूपात भरावं लागतं. पण तुम्ही विचार केला आहे का की कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर थकीत कर्ज कोणाला भरावं लागतं? अशा परिस्थितीत कर्ज वसुलीसाठी बँका काय करतात?

कर्ज वसुलीचे नियम काय आहेत?

नियमानुसार कर्ज घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँक सर्वप्रथम त्या कर्जाच्या सहअर्जदाराशी संपर्क साधते. अशा वेळी सहअर्जदार नसल्यास किंवा सहअर्जदार कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असल्यास बँक गॅरंटरशी संपर्क साधते. जामीनदारानंही कर्जाची परतफेड करण्यास नकार दिल्यास बँक मृत कर्जदाराच्या कायदेशीर वारसदाराशी संपर्क साधून त्यांना वेळोवेळी थकीत कर्जाची रक्कम भरण्याचं आवाहन करते. सहअर्जदार, जामीनदार आणि कायदेशीर वारसदारांपैकी कोणीही कर्जाची परतफेड करू शकलं नाही, तर बँका वसुलीसाठी शेवटच्या पर्यायावर काम करण्यास सुरुवात करतात.

मालमत्ता जप्त करून विकू शकतात

कर्जाच्या वसुलीसाठी बँकांना शेवटचा पर्याय म्हणून मृत व्यक्तीची मालमत्ता जप्त करावी लागते. अशा वेळी मृत व्यक्तीची मालमत्ता विकून कर्ज वसुलीचा अधिकार बँकांना आहे. गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या बाबतीत बँका थेट मृतव्यक्तीचं घर किंवा वाहन जप्त करतात आणि त्यानंतर लिलाव करून ते विकून कर्जाची वसुली करतात. जर एखाद्या व्यक्तीनं पर्सनल लोन किंवा इतर कोणतंही कर्ज घेतले असेल तर अशा परिस्थितीत बँक त्याची इतर कोणतीही मालमत्ता विकून कर्ज वसूल करते.

टॅग्स :बँक