जर तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याची इच्छा असते. काही लोक आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात शिक्षणासाठी पाठवतात. पण, परदेशात उच्च शिक्षण हे मध्यमवर्गीयांसाठी आव्हानापेक्षा कमी नाही. त्यामुळे देशात अशा अनेक बँका आहेत ज्या अतिशय सुलभ आणि कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज देतात. परंतु नंतर कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवू नये यासाठी कर्ज घेण्यापूर्वी जाणून घेतल्या पाहिजेत.
किती लोनची गरज?
तुम्हाला किती रकमेची आवश्यकता आहे हे समजून घेण्यासाठी संस्थेच्या फी पासून ते तुमच्या अभ्यासाचे छोटे-मोठे खर्च जसे की ट्यूशन आणि हॉस्टेल फी, तसंच लॅपटॉप आणि पुस्तकांचं शुल्क इत्यादी देखील लक्षात ठेवा. केवळ कॉलेजच्या फीसाठी कर्ज घेण्याची चूक करू नका कारण नंतर पैशांची कमतरता भासण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
थर्ड पार्टी गॅरंटी
तुम्ही कोणत्याही लोन गॅरेंटरशिवाय ४ लाख रुपयांपेक्षा कमी शैक्षणिक कर्ज मिळवू शकता. परंतु, कर्जाची रक्कम ४ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, थर्ड पार्टी गॅरंटी आवश्यक आहे. एवढंच नाही तर ७.५ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जासाठी कोणतीही मालमत्ता, विमा पॉलिसी, बँक डिपॉझिट सिक्युरिटी म्हणून द्यावी लागेल. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी कर्जाचा जामीनदार तयार करा.
अॅकेडमी रेकॉर्ड / क्रेडिट स्कोअर
वेगवेगळ्या बँकांनी देऊ केलेल्या व्याजदरांची तुलना करणं ही एक आवश्यक पायरी आहे. तुम्हाला मिळणारा व्याजदर तुम्ही निवडलेला अभ्यासक्रम आणि विद्यापीठ तसंच तुमच्या शैक्षणिक रेकॉर्डवर अवलंबून असतो. याशिवाय, कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवणं फायद्याचं ठरू शकतं. कारण ७०० वरील क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो आणि कर्ज देणारा तुम्हाला सहजपणे कर्ज देतो.
लोन रिपेमेंट
बँक शिक्षणादरम्यान तुम्हाला एका वर्षाचं मोरेटोरियम पीरियड देते. यामध्ये रक्कम फेडावी लागत नाही. परंतु यानंतर १५ वर्षांच्या आत तुम्ही रिपेमेंट करू शकता. परंतु ज्या दिवशी लोन मंजुर होतं, तेव्हापासूनच व्याज सुरू होतं. विशेष म्हणजे बँक मोरेटोरियम पीरिअड दोन वर्षांसाठी वाढवू शकते. विद्यार्थ्यांवर कर्जाचं ओझं होऊ नये यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आलीये.