Join us

HDFCमधून लोन घेतलं असेल तर १ जुलैपासून काय बदलणार? खात्यापासून FD पर्यंत काय होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 5:27 PM

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी आणि फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड यांचं विलीनीकरण होणार आहे.

देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी आणि फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड यांचं विलीनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण १ जुलैपासून लागू होणार आहे. हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर अनेक गोष्टी बदलतील. खुद्द एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ३० जून रोजी एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेची बोर्ड बैठक होणार आहे आणि १ जुलैपासून एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेचे विलीनीकरण प्रभावी होईल. या मेगा विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेचे खातेदार आणि एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एचडीएफसी बँकेच्या खातेधारकांवर फारसा परिणाम दिसत नसला तरी ज्यांनी कर्ज घेतलं आहे त्यांच्यावर मात्र याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

विलिनीकरणानंतर काय बदलणार?एचडीएफसी लिमिटेड-एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर, एचडीएफसी लिमिटेडच्या सेवा एचडीएफसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध राहतील. तुम्हाला एकाच शाखेत कर्जापासून बँकिंग सेवांपर्यंत सर्व काही सुविधा मिळतील. बँकेच्या प्रत्येक शाखेतून होमलोन दिलं जाऊ शकतं. या विलीनीकरणानंतर ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. विलीनीकरणानंतर बँकेच्या भांडवलात पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होईल. भांडवल वाढवून बँक पूर्वीपेक्षा अधिक जोखमीचं कर्जही देऊ शकणार आहे.

एफडी असलेल्यांवर काय परिणामएचडीएफसीमध्ये जवळपास २१ लाख डिपॉझिट खाती आहेत. विलीनीकरणानंतर या ठेवीदारांसाठी काय बदल होईल ते जाणून घेऊया. एचडीएफसी बँकेतील फिक्स्ड डिपॉझिटचे (FD) व्याजदर सामान्यतः हाऊसिंग फायनॅन्स कंपनी एचडीएफसीनं देऊ केलेल्या व्याजदरांपेक्षा कमी आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही एचडीएफसीमध्ये ६६ महिन्यांच्या कालावधीसाठी २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवल्यास, तुम्हाला वार्षिक ७.४५ टक्के व्याज मिळेल. त्याच कालावधीसाठी एचडीएफसी बँकेचा व्याज दर ७ टक्के आहे. एचडीएफसी वार्षिक आधारावर व्याजदर देते, तर एचडीएफसी बँक मुदत ठेवींसाठी तिमाही आधारावर व्याज देते.

ज्यांनी रिन्युअलचा पर्याय निवडला आहे, त्यांचे व्याजदर विलीनीकरणानंतर बदलतील. एवढंच नाही तर विलीनीकरणानंतर एचडीएफसीच्या ग्राहकांना त्यांच्या ठेवींवर विम्याचा लाभही मिळणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, बँक ठेवीदारांना ठेवी विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा कव्हर मिळतं.

होम लोन घेणाऱ्यांचं काय?या विलीनीकरणामुळे एचडीएफसी लिमिटेडच्या होम लोनच्या ग्राहकांवर परिणाम होईल. बँकेच्या विलीनीकरणानंतर, आरबीआयच्या नियमांनुसार, बँकेची सर्व कर्जे एक्सटर्नल बेंच मार्क लेंडिंग रेटच्या (EBLR) च्या आधारावर निश्चित केली जातात. दुसरीकडे, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांसाठी अशी कोणतीही आवश्यकता नाही. विलीनीकरणानंतर एचडीएफसी लिमिटेडच्या ग्राहकांनाही आरबीआयचे नियम लागू होतील. या विलीनीकरणानंतर, पुढील सहा महिन्यांसाठी एचडीएफसीच्या कर्जाचे व्याजदर एक्स्टर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटवर आधारित असतील.

विलीनीकरणानंतर, जेव्हा एचडीएफसी लिमिटेड एचडीएफसी बँकेचा भाग होईल, तेव्हा त्यांना हा नियम पाळावा लागेल आणि कर्ज EBLR शी लिंक करावे लागेल. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा लाभ ग्राहकांना लगेच मिळेल. रिझव्‍‌र्ह बँकेनं रेपो रेट कमी केल्यानंतर लगेचच ईबीएलआरशी लिंक नसलेल्या कर्जांना व्याज कपातीचा लाभ मिळत नाही. या विलीनीकरणानंतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना त्याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :एचडीएफसीव्यवसाय