देश डिजिटलायझेशनकडे वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे लोकांची कामं आता सहज होऊ लागली आहेत. पूर्वी अनेक कामं करण्यासाठी बँका आणि सरकारी कार्यालयांमध्ये जावं लागत होतं. पण डिजिटलायझेशनमुळे अनेक कामं घरात बसून सहज करता येतात. आता असं कर्ज घेण्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही.
तुम्ही घरी बसूनही डिजिटल लोनचा लाभ घेऊ शकता. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. हे पेपरलेस कर्ज आहे, जे बँकेच्या डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा मोबाइल अॅपद्वारे घेतलं जाऊ शकतं.
कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम जिकडून तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे ती बँक किंवा वित्तीय संस्था तुम्हाला निवडावी लागेल. यानंतर तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपद्वारे कर्जासाठी अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला तुमची आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, उत्पन्न द्यावं लागेल. तुम्हाला तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील इत्यादी कागदपत्रं सादर करावी लागतील. यासोबतच तुम्हाला डिजिटल साईनचीही आवश्यकता भासू शकते.
किती सुरक्षित आहे लोन?
तुम्ही सुरक्षित संस्था किंवा वित्तीय संस्थेकडून डिजिटल लोन घेतल्यास ते सुरक्षित आहे. डिजिटल कर्ज घेताना, नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपचाच वापर करा. तसंच, कर्जाचे व्याजदर आणि तुम्ही जिथून कर्ज घेत आहात त्या संस्थेची योग्य माहिती ठेवा.
आजकाल कर्जाची अनेक बनावट अॅप्स देखील आली आहेत. जे कर्ज दिल्यानंतर व्याजाच्या नावाखाली लोकांना खूप त्रास देतात. त्यामुळे डिजिटल कर्ज घेण्यासाठी केवळ सुरक्षित वेबसाइट किंवा अॅप वापरणं महत्त्वाचं आहे.
काय आहेत फायदे?
डिजिटल कर्ज घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे जाण्याची गरज नाही.
- यामुळे तुमचा वेळ वाचतो.
- कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ होते.
- कर्ज मंजूर करणं सोपं होतं.
- अगदी छोट्या गरजांसाठीही तुम्ही सहजरित्या कर्ज मिळवू शकता.