Join us  

क्रेडिट स्कोअर खराब असेल तर ५० लाखांच्या Home Loan वर १९ लाख अधिक फेडावे लागणार, पाहा कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 1:10 PM

Credit Score Home Loan : कोणत्याही प्रकारचं कर्ज देण्यापूर्वी बँका क्रेडिट स्कोअर तपासतात. क्रेडिट स्कोअर खराब असेल तर बँक कर्ज देण्यास नकार देते. बँक मॅनेजर तुम्हाला कर्ज द्यायला तयार असला तरी व्याज जास्त आकारलं जातं.

कोणत्याही प्रकारचं कर्ज देण्यापूर्वी बँका क्रेडिट स्कोअर तपासतात. क्रेडिट स्कोअर खराब असेल तर बँक कर्ज देण्यास नकार देते. बँक मॅनेजर तुम्हाला कर्ज द्यायला तयार असला तरी व्याज जास्त आकारलं जातं. जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर बँका सहसा गृहकर्जावर १०.७५% दरानं व्याज आकारतात. त्याचबरोबर बँकांचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास ८.३५ टक्के दरानंही गृहकर्ज दिलं जातं. तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर तुमच्यावर कर्जाचा बोजा कसा वाढतो ते जाणून घेऊया. ५० लाखांच्या गृहकर्जावर तुम्ही १९ लाख रुपये अधिक फेडाल, हेही तुम्हाला समजेल. 

कसा वाढेल कर्जाचा बोजा? 

क्रेडिट स्कोअर कमी असल्यास ५० लाख रुपयांच्या गृहकर्जात तुम्हाला अतिरिक्त १९ लाख रुपये द्यावे लागतील. कसं हे या उदाहरणानं सहज समजून घेऊ. समजा तुमचा क्रेडिट स्कोअर ८२० आहे आणि तुम्ही बँकेत ५० लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी अर्ज करता. तुमचा चांगला क्रेडिट स्कोअर लक्षात घेऊन बँका २० वर्षांसाठी ८.३५ टक्के व्याजदराने गृहकर्ज देतात. या व्याजदराने तुम्ही १.०३ कोटी रुपये (५० लाख रुपयांचे कर्ज आणि ५३ लाख रुपयांचं व्याज) बँकेला परत कराल. तुमचा मासिक ईएमआय ४२,०१८ रुपये असेल. 

आता, समजा, जर तुमचा क्रेडिट स्कोअर ५८० असेल तर ५० लाख रुपयांच्या गृहकर्जावरील व्याजदर १०.७५% पर्यंत जाऊ शकतो. अशात तुम्ही २० वर्षांत तुम्हाला १.२१ कोटी रुपये (५० लाख रुपये मुद्दल आणि ७१.८२ लाख रुपये व्याज) बँकेला परत करावे लागतील. २० वर्षांसाठी तुमचा मासिक ईएमआय ५०,७६१ रुपये असेल. तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असल्यानं अशा प्रकारे तुम्हाला अतिरिक्त १८.८२ लाख रुपये द्यावे लागतील. 

जर तुमचा क्रेडिट स्कोअर ६२० असेल तर अंदाजे व्याज दर १०.२५% असेल. म्हणजेच तुम्हाला ५० लाखांच्या लोनवर १.१७ कोटी रुपये (५० लाख रुपये मुद्दल आणि ६७.७९ लाख रुपये व्याज) परत करावे लागतील. २० वर्षांसाठी तुमचा मासिक ईएमआय ४९,०८२ रुपये असेल. दरम्यान, क्रेडिट स्कोअर किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही समजू शकता. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कधीही खराब करू नका. कर्जाचा ईएमआय आणि क्रेडिट कार्डची बिलं ही वेळेवर भरा.

टॅग्स :बँकपैसा