Join us  

बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते? मर्यादा ओलांडल्यास भरावा लागेल टॅक्स, वाचा बचत खात्याचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 2:22 PM

Savings Account Rules : तुमच्याकडे बचत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, एक चुक तुमचे आर्थिक नुकसान करू शकते.

Savings Account Rules : आजच्या काळात प्रत्येकासाठी बँकेत बचत खाते आवश्यक आहे. जर तुमच्याकडे बँक खाते नसेल तर तुम्ही सरकारी योजनांपासून वंचित राहू शकता. एका क्लिकवर होणारे डिजिटल व्यवहारही करता येत नाहीत. देशात बँक खाती उघडण्यावर कोणतेही बंधन नाही. यामुळे प्रत्येक व्यक्तीची एकापेक्षा अनेक बँक खाती आहेत. बचत खात्यातील तुमचे पैसे सुरक्षित राहतात. शिवाय वेळोवेळी त्यात व्याजरी येत राहते. नियमांनुसार, झिरो बॅलन्स खाते वगळता सर्व खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा बँक तुमच्याकडून दंड वसूल करते. पण बचत खात्यात जास्तीत जास्त किती रक्कम ठेवता येते? तुमच्या खात्यात एकाचवेळी तुम्ही किती रोख रक्कम भरू शकता? याबद्दल माहिती आहे का?

खात्यात किती पैसे ठेवता येतात?नियमांनुसार, तुम्ही तुमच्या बचत खात्यात कितीही रक्कम ठेवू शकता. यासाठी कोणतीही मर्यादा नाही. पण जर तुमच्या खात्यात जमा झालेली रक्कम जास्त असेल आणि ती आयकराच्या कक्षेत येत असेल तर तुम्हाला त्या उत्पन्नाचा स्रोत घोषित करावा लागतो. याशिवाय बँकेच्या शाखेत जाऊन रोख रक्कम जमा करणे आणि काढणे यालाही मर्यादा आहेत. परंतु, चेकद्वारे किंवा ऑनलाइन, तुम्ही तुमच्या बचत खात्यात 1 रुपये ते हजारो, लाख, कोटींपर्यंत कोणतीही रक्कम जमा करू शकता.

रोख जमा करण्याचे नियम कोणते?तुम्ही बँकेत ५०,००० रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा करत असल्यास तुम्हाला त्यासोबत तुमचा पॅन क्रमांक देणे बंधनकार आहे. तुम्ही एका दिवसात १ लाख रुपयांपर्यंत रोख जमा करू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या खात्यात नियमितपणे रोख जमा करत नसल्यास, ही मर्यादा २.५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. याशिवाय, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात त्याच्या खात्यात जास्तीत जास्त १० लाख रुपये रोख जमा करू शकते. ही मर्यादा एक किंवा अधिक खाती असलेल्या करदात्यांना लागू आहे.

अशा व्यवहारांवर आयटीची असते नजरजर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात १० लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली तर बँकेला त्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागते. अशा परिस्थितीत, व्यक्तीला या उत्पन्नाचा स्रोत उघड करावा लागेल. जर ती व्यक्ती आयकर रिटर्नमध्ये स्त्रोताविषयी समाधानकारक माहिती देऊ शकली नाही. तर आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकते. अशा व्यक्तीचे आयकर विभाग चौकशी करू शकते. पकडले गेल्यास मोठा दंड होऊ शकतो. जर व्यक्तीने उत्पन्नाचा स्रोत उघड केला नाही तर जमा केलेल्या रकमेवर ६० टक्के कर, २५ टक्के अधिभार आणि ४ टक्के उपकर लावला जाऊ शकतो. म्हणजे जवळपास सर्वच पैसे पाण्यात जातील.

याचा अर्थ तुम्ही १० लाखांपेक्षा जास्त व्यवहार करू शकत नाही, असे अजिबात नाही. तुमच्याकडे जर कायदेशीर उत्पन्नाचे साधन असेल तर तुम्ही बिनधास्त राहून पैसे जमा करा. खरंतर तुमच्या बचत खात्यात इतके पैसे ठेवणे म्हणजे तोटा आहे. तुम्ही सुरक्षित गुंतवणूक म्हणून ते एफडीमध्ये गुंतवू शकता. जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. 

टॅग्स :बँकगुंतवणूक