Join us  

RBI on Gold Loan : गोल्ड लोन घेणाऱ्यांमध्ये झपाट्याने वाढ! RBI ने व्यक्त केली चिंता; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 12:41 PM

RBI on Gold Loan : देशात सुवर्ण कर्ज घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आता थेट आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे.

RBI on Gold Loan : सध्या बाजारात विविध प्रकारची कर्जे उपलब्ध आहे. यामध्ये पर्सनल लोनपासून बिझनेस लोनपर्यंत अनेक कर्जांचा समावेश आहे. गेल्या काही काळापासून गोल्ड लोन अर्थात सुवर्ण कर्ज लोकप्रिया होताना पाहायला मिळत आहे. याचं कारण म्हणजे कमी कागदपत्रांमध्ये तात्काळ कर्ज मंजूर होते. या सुलभ प्रक्रियेमुळे सुवर्ण कर्जात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी मंजूर केलेल्या सुवर्ण कर्जामध्ये अभूतपूर्व वाढ झाल्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ला दखल घ्यावी लागली आहे.

आकडेवारीनुसार, २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत गोल्ड लोन मंजूरी तब्बल २६ % वाढली आहे, तर मार्च तिमाहीच्या तुलनेत ही वाढ ३२% झाली आहे. एकूण मंजूर रक्कम ७९,२१७ कोटींवर पोहोचली आहे. ही वाढ केवळ एक वेळची घटना नसून गेल्या अनेक तिमाहीपासून सातत्याने सुरू आहे.

गोल्ड लोनमुळे आरबीआय चिंतेतसुवर्ण कर्जामध्ये होणार वाढ आता आरबीआयच्या चिंतेचा विषय झाली आहे. आरबीआयने बँका आणि वित्तीय कंपन्यांना त्यांच्या सुवर्ण कर्ज धोरणांचे आणि प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले आहेत. ३ महिन्यांच्या आत कोणतीही कमतरता दुरुस्त करावी. याचे कारण असे की पुनरावलोकनामध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. यामध्ये बुडीत कर्जे लपवणे, योग्य मूल्यांकनाशिवाय टॉप-अप आणि रोल-ओव्हरद्वारे कर्ज 'एव्हरग्रीन' करणे. यामुळे भविष्यात याचा बँकांना फटका बसू शकतो, अशी चिंता आरबीआयला आहे. 

सर्वसामान्यांना काय सल्ला?गोल्ड लोन सहज उपलब्ध होत आहेत. पण ज्यांना इतर आर्थिक स्रोत मिळू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा शेवटचा उपाय आहे. त्यामुळे हे कर्ज केवळ आपात्कालीन परिस्थितीतच काढावे असा सल्लाही अर्थतज्ञांकडून दिला जातो. आज किरकोळ करणांसाठीही गोल्ड लोन घेत असल्याचेही समोर आले आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकसोनंबँकगुंतवणूक