लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने महागाई आणखी वाढू नये यासाठी रेपो दर स्थिर ठेवले असताना अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात शुक्रवारी वाढ केली आहे. यामुळे गृह व वाहन कर्जाचा ईएमआय आणखी वाढेल.
बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यासारख्या अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एमसीएलआर कर्ज दरात ०.१० टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे याचा परिणाम म्हणून थेट ईएमआय आणखी वाढणार आहे. गुरुवारी सादर केलेल्या पतधोरण आढाव्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवला आहे. असे असतानाही विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी एमसीएलआर वाढविण्याची घोषणा केली आहे.
कोणत्या बँकेने किती केली वाढ?
nबँक ऑफ बडोदाने सांगितले की, एका वर्षाच्या एमसीएलआरला सुधारित करून ८.७० टक्के केले आहे. हा व्याजदर सध्या ८.६५ टक्के आहे. नवीन व्याज दर १२ ऑगस्टपासू्न लागू होणार आहे. कॅनरा बँकेनेही एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे.
nगृहकर्जाचा व्याजदर वाढून आता ८.७० टक्क्यांवर पोहोचला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने एमसीएलआरमध्ये ०.१० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे व्याजदर वाढून ८.५० टक्क्यांवरून ८.६० टक्के झाला आहे. नवीन व्याजदर १० ऑगस्टपासून लागू होणार आहे.
खासगीकडूनही वाढएचडीएफसी बँकेनेही एमसीएलआरमध्ये १५ अंकांची वाढ केली आहे. सध्या बँकेचा एका वर्षाचा एमसीएलआर ९.१० टक्के झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर दरात वाढ केली होती. ही वाढ १ ऑगस्टपासून लागू करण्यात आली आहे.