Join us  

भारताचा UPI आता जग कवेत घेतोय, फ्रान्सनंतर आणखी दोन देश स्वीकारणार 'डिजिटल इंडिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 9:33 AM

इंडियन युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) व्याप्ती सातत्यानं वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आयफेल टॉवरच्या (Eiffel Tower) माध्यमातून फ्रान्समध्ये याची सुरुवात करण्यात आली.

इंडियन युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) व्याप्ती सातत्यानं वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आयफेल टॉवरच्या (Eiffel Tower) माध्यमातून फ्रान्समध्ये याची सुरुवात करण्यात आली. इतकंच नाही, तर आता श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही युपीआय लॉन्च होणार आहे. अशा प्रकारे, अशा देशांची यादी आता मोठी होत चालली आहे. या माध्यमातून पेमेंट एकतर भारतीय पेमेंट सिस्टमद्वारे घेतलं जात आहे किंवा ते तिथल्या जलद पेमेंट नेटवर्कद्वारे जोडलेलं आहे.  

आज दुपारी १ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांच्या उपस्थितीत श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन्ही देशांमध्ये युपीआय लॉन्च केलं जाईल. केंद्रीय बँकांचे गव्हर्नरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

मॉरिशसमध्ये RuPay Card लॉन्च होणार 

भारत सरकारनं ११ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युरीआय प्रणाली सुरू केल्यानं मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होईल आणि या देशांशी डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढेल. यामुळे भारतीय पर्यटकांना या देशांना भेटी देताना पैसे भरताना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या देशांतील नागरिकांना भारतात आल्यावरही पैशांचे व्यवहार करणं सोपं होणार आहे. युपीआय  व्यतिरिक्त, रुपे कार्ड सेवा देखील मॉरिशसमध्ये सुरू केली जाईल. हे कार्ड लॉन्च केल्यामुळे, मॉरिशसच्या बँका RuPay यंत्रणेवर आधारित कार्ड जारी करू शकतील. याद्वारे भारत आणि मॉरिशसमध्ये रुपे कार्डद्वारे व्यवहार करता येतील. 

युपीआयची व्याप्ती वाढतेय 

गेल्या काही वर्षांपासून, भारतीय अधिकारी जागतिक स्तरावर भारतीय चलन रुपया आणि त्याच्या पेमेंट सिस्टमच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. रिझर्व्ह बँकेनं जुलै २०२२ मध्ये या संदर्भात एक यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवहार रुपयांमध्ये करता येतील. जुलै २०२२ मध्ये, भारतानं युपीआयला UAE च्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी एक सामंजस्य करार केला. त्याआधी फेब्रुवारीमध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यात युपीआय आणि सिंगापूरची फास्ट पेमेंट सिस्टम PayNow ला जोडण्यासाठी करार करण्यात आला होता. याशिवाय UPI द्वारे पेमेंट लागू करण्यासाठी इंडोनेशिया, लॅटिन अमेरिकन आणि आफ्रिकन देशांशीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :श्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीनरेंद्र मोदी