Indian Workforce : दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई आणि बदलती जीवनशैली मध्यमवर्गीयांचा खिसा खाली करत आहेत. याचा सर्वाधिक फटका नोकरदार वर्गाला बसत असल्याचे समोर आले आहे. भारतीय नोकरदार वर्ग पूर्वीपेक्षा जास्त कर्जात बुडत आहे. गेल्या २ वर्षांत कर्ज घेणाऱ्यांची संख्या कैक पटीने वाढली आहे. एका सर्वेक्षणानुसार, बहुतेक नोकरदार लोकांवर २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडाही वाढला आहे. मेट्रो शहरांमध्ये कर्जाशिवाय राहणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. नोकरदार महिलांवर बहुतांश गृहकर्ज आहे.
७० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांवर कर्जाचा डोंगरसर्वेक्षणानुसार केवळ १३.४ टक्के नोकरदार कर्जाशिवाय जगत आहेत. २०२२ मध्ये हा आकडा १९ टक्के होता. गेल्या २ वर्षांत अनेक नोकरदारांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारची कर्जे घेतल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. नोकरी करणाऱ्यांमध्ये २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या प्रकारात जवळपास ९१.२ टक्के नोकरदार येतात. गेल्या वर्षी हा आकडा ८८ टक्के होता. या सर्वेक्षणात २२ ते ४५ वयोगटातील १५२९ लोकांनी आपलं मत नोंदवलं. यापैकी ४० टक्के महिला होत्या. या सर्वांचा पगार किमान ३० हजार रुपये होता.
घर आणि गाडीशिवाय सहलीसाठीही कर्ज सर्वेक्षणानुसार, कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांसारखी आर्थिक उत्पादने बहुतेक काम करणारे लोक वापरतात. अशा लोकांना डिजिटल व्यवहारांचे चांगले ज्ञान आहे. सध्या कार्यरत असलेल्या २२ ते २७ वर्षे वयोगटातील तरुणांना तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान आहे. त्यांना नवीन आर्थिक साधनांबद्दल देखील जाणून घ्यायचे आहे. यानंतर २८ ते ३४ वयोगटातील लोक येतात, ज्यांना कामाचा चांगला अनुभव आहे. घर आणि कार खरेदी करण्यासोबतच ते आंतरराष्ट्रीय प्रवासही करत आहेत. तिसरा गट ३५ ते ४५ वर्षांचा आहे, जो आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत आहे.
कुठल्या कर्जाला प्राधान्यभारतीय कर्मचाऱ्यांमध्ये घर खरेदीला प्रथम क्रमांकाचे प्राधान्य आहे. यानंतर आरोग्य, नातेसंबंध, प्रसिद्धी आणि प्रगतीवर पैसे खर्च करायला आवडतात. नोकरी करणारे लोक प्रवास आणि निवृत्तीवर जास्त विचार करत नाही. स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा तरुणांमध्येही वाढली आहे. त्यांना स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे. या बाबतीत महिला पुढे आहेत. पूर्व भारतात काम करणाऱ्या लोकांना शैक्षणिक कर्ज, दक्षिण भारतात कार कर्ज आणि उत्तर आणि पश्चिम भारतात गृहकर्ज घेण्यासाठी लोक प्राधान्य देतात.
कर्जाचे विविध प्रकार उपलब्धनोकरदार वर्गामध्ये कर्ज घेण्याचे प्रमाण वाढण्यामागे कर्जाची सुलभता हेही महत्त्वाचं कारण आहे. सध्या बाजारात बँकांव्यतिरिक्त अनेक वित्तीय संस्था कर्जपुरवठा करतात. कमी कागदपत्रांमध्ये आता काही तासांत कर्ज मंजूर होते. शिवाय पूर्वी मर्यादीत गोष्टींसाठीच कर्ज मिळत होते. आता वैयक्तिक कर्जापासून हनिमूनपर्यंत अनेक गोष्टींसाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे. अगदी इन्स्टंट लोनही काही कंपन्या ऑफर करतात.