लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: घेतलेल्या कर्जावरील ईएमआय वाढला की कर्जदाराचे महिन्याचे बजेट पूर्णपणे कोलमडते. परंतु आरबीआयने कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जावरील व्याजदरात बदल करीत असताना बँकांनी आधीच कर्ज घेतलेल्या ग्राहकांचा विचार करून त्यांना फ्लोटिंगवरून फिक्स्ड व्याज दर निवडण्याचा पर्याय दिला पाहिजे, अशा सूचना आरबीआयने बँकांना शुक्रवारी दिल्या आहेत.
आरबीआयने अधिसूचनेत म्हटले आहे की, व्याजदरात वाढ केल्याने ईएमआय व परतफेडीचा कालावधी यात वाढ होते. कर्ज घेणाऱ्यांना याची नीटपणे माहिती दिली जात नाही. त्यांची सहमतीही घेतली जात नाही. अशा अनेक तक्रारी आहेत. अशा कर्जदारांची चिंता दूर करण्यासाठी बँकांना ठोस धोरण तयार केले पाहिजे. कर्ज घेतानाच व्याजदरात बदल केल्याने ईएमआय तसेच परतफेडीच्या कालखंडावर होणाऱ्या परिणामांची कल्पना कर्जदारांना दिली पाहिजे, तसेच या बदलाची सूचना बँकांनी ग्राहकाला तत्काळ दिली पाहिजे.
कधीही परतफेडीचा सुविधा असावी
- नव्याने व्याजदर निश्चित करीत असताना बँकांनी ग्राहकांना फिक्स्ड व्याजदर निवडण्याचा पर्यायही दिला पाहिजे. कर्ज फेडण्याच्या कालावधीत ग्राहकांना व्याजदर निवडण्याचा पर्याय किती वेळा वापरता येईल, याचीही माहिती बँकांनी दिली पाहिजे.
- तसेच ग्राहकांना कर्जफेडीचा अवधी वाढविण्याचा पर्यायही दिला पाहिजे.
- अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, कर्जदारांना कर्जाचा काही हिस्सा किंवा पूर्ण रकमेची परतफेड करण्याची सोय कर्जाचा कालावधी पूर्ण होण्याआधी बँकांनी उपलब्ध करून दिली पाहिजे.
- ही सुविधा कर्ज घेतल्यानंतर कर्जदाराला कधीही घेता आली पाहिजे.