Join us  

बँकांमध्ये सुरक्षित आहे का तुमचा पैसा? अमेरिकन संकटाचा भारतीय बँकिंग सिस्टमवर काय होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:31 PM

"अलीकडच्या घडामोडींमुळे बँकिंग क्षेत्राच्या आर्थिक स्थैर्याचे आणि स्थिरतेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आलंय."

भारताचे बँकिंग क्षेत्र आणि वित्तीय व्यवस्था अमेरिका आणि स्वित्झर्लंडमधील अलीकडील घडामोडींपासून पूर्णपणे अलिप्त असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. देशाची बँकिंग व्यवस्था स्थिर आणि सुदृढ असल्याचंही ते म्हणाले. अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना दास यांनी यावर भाष्य केलं. जागतिक स्तरावर अमेरिका आणि स्वित्झर्लंडच्या बँकिंग व्यवस्थेतील अलीकडच्या घडामोडींमुळे बँकिंग क्षेत्राच्या आर्थिक स्थैर्याचे आणि स्थिरतेचे महत्त्व पुन्हा एकदा समोर आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

बँकिंगशी संबंधित मानकांबद्दल बोलायचे झाल्यास, तो रोख प्रवाह असो, बँकांचं निव्वळ व्याज मार्जिन असो, बँकांचा नफा असो, कोणत्याही पैलूंवरून पाहिलं तर भारताची बँकिंग व्यवस्था उत्तम आहे. जिथे रिझर्व्ह बँकेचा संबंध आहे, तर गेल्या काही वर्षांमध्ये, रिझर्व्ह बँकेनं नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांसह (NBFCs) संपूर्ण बँकिंग प्रणालीचे पर्यवेक्षण, नियमन सुधारणा केल्या आहेत आणि ते कठोरही केलेत, असं दास यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

परकीय चलन साठा ९ महिन्यांच्या उच्चांकावरदेशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीबद्दल बोलायचं झालं तर तो नऊ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. शुक्रवारी रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ७ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात, भारताचा परकीय चलन साठा ६.३ अब्ज डॉलर्सनं वाढून ५८४.७५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. यापूर्वी, ३१ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यानंतर, हा साठा ५७८.४५ अब्ज डॉलर्स झाला होता. त्या दरम्यान परकीय चलनाच्या साठ्यात ३.२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती. परकीय चलनाच्या साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. या कालावधीत भारताच्या गोल्ड रिझर्व्हमध्येही १.४९ अब्ज डॉलर्सनं वाढ झाली असून तो ४६.६९ अब्ज डॉलर्सवर पोहोचलाय.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास