Join us  

जनधन योजनेची दशकपूर्ती; 53.13 कोटी लोकांनी घेतला लाभ, किती लाख कोटी जमा? पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 2:38 PM

Jan Dhan Yojana : 53.13 कोटी खात्यांपैकी 29.56 कोटी खाती महिलांची आहेत.

Jan Dhan Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांशी योजनांपैकी एक असलेल्या जन धन योजनेला (Jan Dhan Yojana) आज 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेबाबत आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी महत्वाची माहिती दिली. 10 वर्षांपूर्वी, 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री जन धन योजना पूर्णत: यशस्वी झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तसेच, सध्या देशात 53.13 कोटी लोकांनी जन धन खाती उघडली आहेत, ज्यात सुमारे 2.3 लाख कोटी रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री जन धन योजनेचा 10 वा वर्धापन दिन प्रधानमंत्री जन धन योजनेच्या (PMJDY) 10 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, कोविड महामारीच्या काळात या योजनेने सरकारला खूप मदत केली. याचा महिलांनाही मोठा फायदा झाला. या खात्यांमध्ये किमान शिल्लक राखण्याचे कोणतेही बंधन नाही. असे असूनही, केवळ 8.4 टक्के खात्यांमध्येच झिरो बॅलेन्स आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा खेड्यापाड्यात आणि शहरात राहणाऱ्या सामान्यांना झाला. या भागात सुमारे 66.6 टक्के जन धन खाती उघडली आहेत.

53.13 कोटी खाती उघडलीअर्थमंत्री पुढे म्हणतात, 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात झालेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेत आतापर्यंत 53.13 कोटी लोकांनी खाती उघडली आहेत, ज्यात सुमारे 2.3 लाख कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, यातील सुमारे 80 टक्के खाती अॅक्टिव्ह आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत अशा खात्यांची सरासरी शिल्लक वाढून 4,352 रुपये होईल, जी मार्च 2015 मध्ये केवळ 1,065 रुपये होती. या आर्थिक वर्षात आणखी 3 कोटी जन धन खाती उघडली जातील, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

29.56 कोटी खाती महिलांची 14 ऑगस्ट 2024 पर्यंत उघडलेल्या 53.13 कोटी खात्यांपैकी 55.6 टक्के (29.56 कोटी) खाती महिलांची आहेत. देशातील सुमारे 99.95 टक्के खेड्यांमध्ये 5 किमीच्या परिघात बँक शाखा, एटीएम, बँकिंग करस्पॉडंट आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसह काही टचपॉईंटद्वारे बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. देशात 1.73 अब्ज पेक्षा जास्त ऑपरेटिव्ह चालू खाती असून, त्यापैकी 53 कोटींहून अधिक जन धन खाती आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विविध योजनांमधून करोडो लोकांना दिलासानिर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत 20 कोटी लोकांना 436 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाख रुपयांचा जीवन विमा देण्यात आला आहे. तसेच, सुमारे 45 कोटी लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 20 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा देण्यात आला आहे. अटल पेन्शन योजनेत 6.8 कोटी लोकांचा सहभाग आहे. स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 53,609 कोटी रुपयांची 236,000 कर्जे मंजूर करण्यात आली आहेत. 65 लाखांहून अधिक पथ विक्रेत्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतून 12,630 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे.

 

टॅग्स :निर्मला सीतारामनभाजपानरेंद्र मोदी