लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारी बँकांतील रिक्त पदे भरण्याची जय्यत तयारी केंद्रीय वित्त मंत्रालयाने चालविली असून नुकतीच यासंबंधीची एक बैठक पार पडल्याचे समजते. रिक्त पदांमुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारी बँकांमध्ये रिक्त असलेली ४१ हजार पेक्षा अधिक पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
मागील १० वर्षांत देशात बँक शाखांची संख्या २८ टक्क्यांनी वाढली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या मात्र वाढण्याऐवजी १ टक्क्याने घटली आहे. बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या १० वर्षांत २६ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, लिपिक आणि अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या १९ टक्क्यांनी कमी झाली आहे. सरकारी बँकांत २०१०-११ मध्ये ७.७६ लाख कर्मचारी होते. २०२०-२१ मध्ये ही संख्या घटून ७.७१ लाखांवर आली. लिपिकांची संख्या १३ टक्क्यांनी, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या २७ टक्क्यांनी घटली.
कोणत्या बँकेत किती पदे रिक्त?
nस्टेट बँक ऑफ इंडिया - ८,५४४
nपंजाब नॅशनल बँक - ६,७४३
nसेंट्रल बँक ऑफ इंडिया - ६,२९५
nइंडियन ओव्हरसीज बँक - ५,११२
nबँक ऑफ इंडिया - ४,८४८
७.७१ लाख कर्मचारी सरकारी बँकांत
२६% टक्के वाढली अधिकाऱ्यांची संख्या. लिपिक व कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या १९ टक्क्यापेक्षा अधिक घटली.
१००० ग्राहकांमागे एक कर्मचारी सरकारी बँकांत. खासगी बँकांत १०० ते ६०० ग्राहकांमध्ये आहे १ कर्मचारी.
nकर्मचाऱ्यांची टंचाई आकडेवारीनुसार, सरकारी बँकांत १ हजार ग्राहकांमागे एक कर्मचारी आहे. खासगी बँकांत १०० ते ६०० ग्राहकांमागे एक कर्मचारी आहे. यावरून सरकारी बँकांतील कर्मचारी टंचाईची कल्पना यावी.
nइतकी पदे आहेत रिक्त
डिसेंबर २०२१ पर्यंत सरकारी बँकांत एकूण स्वीकृत ८,०५,९८६ पदांपैकी ५ टक्के म्हणजेच ४१,१७७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी वित्तीय सेवा सचिव संजय मल्होत्रा बँकांशी भेटून कृती कार्यक्रम मागणार आहेत.