Personal Loan : आर्थिक संकट सांगून येत नाही. कोणालाही आयुष्यात कधीही पैशाची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत तुमच्याकडे आपात्कालीन निधी नसेल तर कर्ज घेण्यावाचून पर्याय राहत नाही. जेव्हा लोकांना अचानक खूप पैशांची गरज भासते तेव्हा पहिल्यांदा मनात वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार येतो. तुम्हीही तुमच्या कोणत्याही कामासाठी पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या गरजेनुसार चांगले वैयक्तिक कर्ज निवडणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय तुमचे कर्ज लवकरात लवकर सेटल करण्यासाठी तुम्ही कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
पर्सनल लोनचा व्याजदर
कोणतेही कर्ज घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जाचा व्याजदर. कमी व्याजदराने कर्ज देणाऱ्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे कधीही फायद्याचे आहे. यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची तुलना करुन निर्णय घ्यावा लागेल. कमी व्याजदरात कर्ज मिळवण्यासाठी नामांकित बँकेकडून कर्ज घ्या.
कर्ज परतफेड कालावधी
वैयक्तिक कर्ज घेताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज परतफेड कालावधी. हा कालावधी काळजीपूर्वक निवडा. तुम्ही अल्प कालावधीसाठी कर्ज घेतल्यास, तुमचा मासिक EMI जास्त असेल, अशा परिस्थितीत तुमचे बजेट विस्कळीत होणार नाही ना? हे तपासून पाहा. जर तुम्ही जास्त कालावधीसाठी कर्ज घेतल्यास तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. अशा परिस्थितीत तुमचे बजेट लक्षात घेऊन कर्ज परतफेडीचा कालावधी निवडा.
लोन प्रोसेसिंग फी
जेव्हा तुम्ही वैयक्तिक कर्ज घेता तेव्हा तुम्हाला प्रक्रिया शुल्क म्हणून काही पैसे द्यावे लागतात. कर्जाशी संबंधित काम करण्यासाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत ज्या बँकेचे प्रोसेसिंग फी कमी आहे अशा बँकेकडून कर्ज घ्या. पण, प्रक्रिया शुल्क आणि व्याजदर यांच्यामध्ये, व्याजदराला अधिक प्राधान्य द्या. नाहीतर कमी प्रक्रिया शुल्क म्हणून महाग कर्ज घेऊ नका. या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन निवड करा.
गरज असेल तरच वैयक्तिक कर्ज घ्या
शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा खूप गरज असेल आणि सर्व पर्याय बंद होतील. तेव्हाच पर्सनल लोन घेण्याचा विचार करा. कारण, वैयक्तिक कर्ज कोणत्याही कर्जापेक्षा खूप महाग असते. अशा परिस्थितीत अनावश्यक गोष्टींसाठी कर्ज घेतल्यास तुमच्यावर कर्जाचे ओझे होऊ शकते.