Join us  

कर्ज कमी करण्याची 'ही' आहे उत्तम पद्धत, परंतु निर्णय घेण्यापूर्वी 'या' गोष्टींकडेही लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 11:57 AM

Home Loan हे दीर्घ कालावधीचं कर्ज असतं. ते फेडण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणात बँकेला व्याजही द्यावं लागतं.

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकदा आपण हे स्वप्न बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पूर्ण करतो. होम लोन हे दीर्घकाळ चालणारं कर्ज आहे. त्यामुळे ते फेडताना बँकेला आपल्याला मोठ्या प्रमाणात व्याजही द्यावं लागतं. कर्जाची मुदत जितकी जास्त असेल तितके व्याजाच्या रुपात पैसेही अधिक द्यावे लागतात. या परिस्थितीत दिलासा मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे होमलोनचं प्रीपेमेंट. कर्जातून लवकर मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्याबद्दल आपण आज जाणून घेऊ.

काय असतं लोन प्रीपेमेंटजर तुम्हाला कुठूनही अतिरिक्त उत्पन्न मिळत असेल, तर ती रक्कम कर्जाच्या प्रीपेमेंटसाठी वापरली जाऊ शकते. हे तुम्हाला कर्जाचा कालावधी कमी करण्यास मदत करेल. गृहकर्जासारख्या मोठ्या कर्जाच्या बाबतीत, सुरुवातीच्या वर्षांत प्रीपेमेंटमुळे तुमचा कर्जाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो. कर्जाच्या प्रीपेमेंटसह, तुम्ही त्या कर्जाचा कालावधी कमी करू शकता किंवा त्याची ईएमआयची रक्कम कमी करू शकता. तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. तुम्ही प्रीपेमेंट करता तेव्हा, ही रक्कम थेट मूळ रकमेतून कमी केली जाते. यामुळे तुमचा मासिक हप्ता कमी होतो. कर्जाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर प्रीपेमेंट केल्याने ईएमआय कमी होतो आणि व्याजातही बचत होते. यामुळेच हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

प्रीपेमेंटचा फायदाजेव्हा तुम्ही प्रीपेमेंट करता तेव्हा ती रक्कम प्रिन्सिपल अमाऊंटमधून कमी केली जाते. त्यामुळे तुमची प्रिन्सिपल अमाऊंट कमी होते. जेव्हा तुम्ही प्रीपेमेंट करता तेव्हा मोठ्या प्रमाणात तुमचं जाणारं व्याजही वाचतं. तुमची प्रिन्सिपल अमाऊंट कमी झाल्यानं तुमचा ईएमआयदेखील कमी होतो. याशिवाय तुमचा क्रेडिट स्कोअरही उत्तम होतो. तसंच तुम्ही लोन फेडण्यास सक्षम आहात याची खात्रीही कर्ज देणाऱ्यांना वाटते. अशात भविष्यात गरज असेल तर तुम्हाला कर्ज सहजरित्या मिळतं. 

या गोष्टी ठेवा लक्षात

  • फ्लोटिंग रेटवर घेतलेल्या होम लोनच्या प्रीपेमेंटवर सामान्यत: कोणताही चार्ज द्यावा लागत नाही. परंतु तुम्ही लोन प्रीपेमेंट करण्यापूर्वी याची माहिती तपासून घ्या. तुमच्या लेंडरकडून सर्व प्रकारच्या टर्म आणि कंडिशन माहित करून घ्या आणि त्यानंतर प्रीपेमेंटचा निर्णय घ्या.
  • जर तुम्ही पर्सनल लोन किंवा कार लोन घेतलं असेल तर अशात तुम्हाला होम लोन पूर्वी ते बंद करायला हवं. या सर्वांचेच व्याजदर होमलोनपेक्षा अधिक असतात.
  • होम लोनच्या प्रीपेमेंटसाठी इमर्जन्सी फंडाचा बिलकूल वापर करू नये. यामुळे तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
  • होमलोन प्रीपेमेंटचा निर्णय आपल्या कौटुंबीक गरजा आणि आर्थिक स्थिती पाहून घ्या. कोणत्याही पॉलिसीच्या किंवा एफडीच्या पैशानं होम लोनचं प्रीपेमेंट करू नका. 
  • होम लोनचा कालावधी २०-३० वर्षांचा असतो. अशात प्रीपेमेंटचा निर्णय कधी घेताय हे महत्त्वाचं असतं. जर तुम्ही सुरुवातीच्या कालावधीत लोनचं प्रीपेमेंट करत असाल तर तुमचं व्याज वाचेल आणि ईएमआय कमी होईल. जर तुम्ही उशिरा प्रीपेमेंटचा निर्णय घेतला तर अतिरिक्त फंड दुसरीकडे गुंतवा आणि होमलोन निर्धारित वेळेतच फेडा.

 

टॅग्स :बँकपैसा